श्रीराम प्रतिष्ठान तर्फे करमाळ्यात उद्या सामुदायिक विवाह सोहळा
श्रीराम प्रतिष्ठान तर्फे करमाळ्यात उद्या सामुदायिक विवाह सोहळा
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १५/ करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य- दिव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दि. १६/ २/ २०२५ रोजी रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी, देवीचामाळ रोड, बायपास चौक, करमाळा येथे करण्यात आले आहे. हा लग्न सोहळा सायं. ०६. २१ मि. या शुभमुहूर्तावर असून या विवाह सोहळ्यात २८ जोडपे विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गणेश चिवटे म्हणाले की, श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली दोन वर्षापासून आम्ही करमाळा तालुका व परिसरातील सर्व जाती धर्माच्या गोरगरीब, शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे विवाह मोफत लावून देत आहोत. पहिल्या वर्षी २०२३ मध्ये २१ तर २०२४ मध्ये ३१ वधू-वरांचे विवाह आम्ही लावून दिले असून यंदाचे हे विवाह सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे. करमाळा शहरातील मुख्य चौकातून सर्व नवरदेवांची घोड्यांवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने वधूला दोन साड्या, मनी मंगळसूत्र, पैंजण, जोडवे, बिछवे व चप्पल तर वराला दोन ड्रेस, बुट तसेच संसारोपयोगी पाच भांडी आणि विवाह सोहळा झाल्यानंतर शिदोरी देण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायं ५ या वेळेत २५ हजार पेक्षा अधिक वऱ्हाडींसाठी टेबल खुर्चीवर भोजन व्यवस्था केली आहे. या विवाह सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांसह करमाळा तालुक्यातील महिला, पुरुष, आत्पेष्ट व मित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन चिवटे यांनी शेवटी बोलताना केले.
हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, श्रीराम नागरी पतसंस्थेचे कर्मचारी, जी एन सी मिल्क सेंटरचे कर्मचारी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेत आहेत.