दहिगाव ग्रामसभेत पत्रकाराला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

दहिगाव ग्रामसभेत पत्रकाराला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी
सरपंच समर्थक आला गोत्यात
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील दहीगाव येथील ग्रामसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर वाद सुरु असताना त्याचे फोटो व व्हिडीओ काढणाऱ्या एका पत्रकाराला सरपंचाच्या समर्थकाने मारहाण करत धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पत्रकार संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पत्रकार शिवा माणिक म्हस्के हे दहीगाव येथील ग्रामसभेत उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी ग्रामसभेतील विषयांवरून सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रश्न विचारले होते. यावरून तिथे वाद निर्माण झाला. वाढता वाद पाहून, अनुचित प्रकार घडू नये म्हणून फिर्यादी म्हस्के यांनी डायल ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत मागितली.
पोलिसांना बोलावल्याचा राग आल्याने सरपंचाचा चुलतभाऊ असलेल्या आरोपी गणेश लक्ष्मण वाघ (रा. दहीगाव, ता.नगर) याने फिर्यादी म्हस्के यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तुला पोलिसांना फोन करण्याची काय गरज होती?” असे म्हणत आरोपींनी फिर्यादींना चपलेने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, “तू लय मोठा पत्रकार झालाय का? कोणाच्या बातम्या लावतो, व्हिडिओ काढतो? आता कोणाचीही बातमी लावून दाखव, तुला जिवे मारून टाकीन,” अशी धमकी दिली.या घटनेनंतर शिवा म्हस्के यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या फिर्यादी वरून आरोपी गणेश वाघ याच्या विरुद्ध बीएनएस कलम सह महाराष्ट्र पत्रकार संरक्षण अधिनियम २०१७ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधिक्षक शिरीष वमने हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.


