महात्मा फुले कृषि विद्यापीठात शेळीपालनावरील तीन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न
महात्मा फुले कृषि विद्यापीठात शेळीपालनावरील तीन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न
राहुरी वृत्तसेवा / जावेद शेख
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पाच्या वतीने शाश्वत शेळीपालन तंत्र या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील शेळीपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसेच शाश्वत व व्यावसायिक शेळीपालनाबाबत, नवनवीन तंत्रज्ञानाबाबत सजगता निर्माण व्हावी या हेतूने महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे प्रशिक्षणे आयोजित करण्यात येत आहेत. या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी संशोधन उपसंचालक डॉ. बाळासाहेब पाटील, प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रशिक्षण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्रनाथ निमसे व डॉ. अमर लोखंडे उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाळासाहेब पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की शेतकऱ्यांनी विद्यापीठामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला शेळीपालन व्यवसाय फायदेशीर करून जास्तीत जास्त नफा मिळवावा. शेळीच्या दुधाला अनन्य साधारण असे औषधी महत्त्व आहे. त्याचा उपयोग शेळीपालकांनी आपल्या शेळीपालनाच्या व्यवसायात जास्तीत जास्त करून घ्यावा. सदरच्या प्रशिक्षणात डॉ. समीर ढगे, डॉ. दिलीप देवकर, डॉ. महेंद्र मोटे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. रवींद्र निमसे, डॉ. अमर लोखंडे व डॉ. विष्णू नरवडे या शास्त्रज्ञांनी शास्त्रोक्त पद्धतीने पैदास, आहार व आरोग्य व्यवस्थापन, पशुधनासाठी चारा व्यवस्थापन तसेच शेळीच्या दुधाचे गुणधर्म व मूल्यवर्धन, अझोला व गांडूळ खत निर्मिती यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. विष्णू नरवडे यांनी आतापर्यंत 24 प्रशिक्षणांद्वारे 918 प्रशिक्षणार्थ्यांनी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पुस्तिका व प्रमाणपत्र देण्यात आले. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण 30 प्रशिक्षणार्थ्यांनी भाग घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संदीप पवार, श्री. गौरव घोलप व श्री. रमेश कलापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.