जिल्हा परिषद शाळा मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी – आरटीओ अधिकारी रूपाली खर्से यांचे प्रतिपादन

जिल्हा परिषद शाळा मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी – आरटीओ अधिकारी रूपाली खर्से यांचे प्रतिपादन
उक्कडगांव प्रतिनिधी : बाबु तिपुळे
नगर तालुक्यातील उक्कडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव, इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा त्रिवेणी संगम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि अभिमानाचे वातावरण दाटून आले होते.
या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या आरटीओ अधिकारी रूपाली खर्से यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा परिषद शाळा या केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नसून, त्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारी संस्कारकेंद्रे आहेत. याच शाळांमधून घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर झळकत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच नवनाथ म्हस्के होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून मराठी शाळांमधील शिक्षणाची भक्कम पायाभरणी कशी विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवते, यावर प्रकाश टाकला. तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेत दररोज किमान एक तास अभ्यासासाठी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालचमूची गावातून ट्रॅक्टरमधून आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. रंगीबेरंगी वेशभूषेत सजलेल्या लहानग्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद आणि उत्साहाने संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले.
सातवीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभात मनोगत व्यक्त करताना शाळेने दिलेल्या संस्कारांची आणि शिक्षणाची कृतज्ञतेने आठवण केली. शाळेशी जुळलेली नाळ व्यक्त करताना अनेक विद्यार्थी भावूक झाले होते.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये माधवी कुलट (इयत्ता तिसरी) शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रात प्रथम, श्रेयस शिंदे (इयत्ता पाचवी) केंद्रात प्रथम, अनुष्का म्हस्के (इयत्ता सहावी) केंद्रात चतुर्थ क्रमांक, इस्रो सहलीसाठी निवड झालेला गणेश भुजबळ तसेच प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात प्रथम आलेला आर्यन पवार यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिवाजी मोरे, पत्रकार बाबासाहेब तिपुळे, मेजर अनिल म्हस्के, किसान म्हस्के, लतीफ पठाण, दिनेश कुलट यांच्यासह शिक्षिका अश्विनी पादिर, मनीषा खर्से, अर्चना जंबे, आरती ढूस व ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती जंबे यांनी मानले.
उत्साह, संस्कार आणि गुणवत्तेचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्याने “शाळा म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, तर आयुष्य घडवण्याचे खरे केंद्र” ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित केली.


