वांबोरी घाट खून प्रकरणी धक्कादायक वळण; वडील व सख्ख्या भावानेच केली हत्या
वांबोरी घाट खून प्रकरणी धक्कादायक वळण; वडील व सख्ख्या भावानेच केली हत्या
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ४८ तासांत आरोपी वडील व भाऊ गजाआड
राहुरी तालुका जावेद शेख
वांबोरी परीसरातील डोंगरगण घाटात दरीत गोणीत बांधून फेकण्यात आलेल्या अनोळखी पुरुषाच्या खुनाची उकल करण्यात अखेर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, या प्रकरणी मयताचे वडील व भाऊ यांना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजण्यापूर्वी वांबोरी ते डोंगरगण गावाच्या शिवारात, डोंगरगण घाटातील डांबरी रस्त्यापासून वन विभागाच्या हद्दीत गट नं. 474 मध्ये दरीत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असलेल्या या व्यक्तीचा अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून खून करून मृतदेह गोणीत बांधून दरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या घटनेप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शेषराव तांदळे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 120/2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) व 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अनोळखी मृताची ओळख पटविणे व आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले होते त्यानुसार
पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार विष्णू भागवत, दीपक घाटकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड व चालक महादेव भांड यांचा समावेश असलेल्या पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी चौकशी सुरू केली. मागील काही दिवसांत हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली असता, राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील एक इसम बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्याबाबत अधिकृत मिसिंग तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. या धाग्यावरून पथकाने 19 फेब्रुवारी 2026 रोजी टाकळीमिया येथे जाऊन सखोल चौकशी केली असता, शिवाजी शंकर कवाणे (वय 55) व योगेश शिवाजी कवाणे (वय 30, दोन्ही रा. टाकळीमिया, तालुका राहुरी यांना ताब्यात घेतले असता चौकशीदरम्यान योगेश कवाणे याने त्याचा भाऊ किरण शिवाजी कवाणे हा वारंवार दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करत असल्याच्या कारणावरून वडिलांच्या मदतीने त्याचा खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार क्र. MH 46 X 7460 पोलिसांनी जप्त केली आहे.
अटक आरोपींना पुढील तपासासाठी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. ही कारवाई सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.



