Breaking
ब्रेकिंग

आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांचा गौरव

0 8 6 5 0 9

आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांचा गौरव

राहुरी तालुका / जावेद शेख

पुणे येथील यशदा येथे दि. 6 ते 8 सप्टेंबर, 2026 दरम्यान आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद-2026 चे आयोजन करण्यात आले होते. ही आंतरराष्ट्रीय परिषद डाळिंब संशोधनाच्या प्रगतीसाठी कार्यरत संस्था, सोलापूर आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद-राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांसह पदव्युत्तर विद्यार्थ्याने उत्कृष्ट संशोधनपर सादरीकरण करून तीन सर्वोत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळविले.
या परिषदेत वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे यांनी हवामानावर आधारित डाळिंबातील अँथ्रॅक्नोज रोगाचा शास्त्रीय अभ्यास व पूर्वानुमानाद्वारे हवामान-सक्षम डाळिंब उत्पादन या विषयावर मौखिक सादरीकरण केले. त्यांच्या उत्कृष्ट संशोधन सादरीकरणाची दखल घेत त्यांना सर्वोत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हवामानातील विविध घटकांचा डाळिंबातील अँथ्रॅक्नोज रोगाच्या प्रादुर्भावाशी असलेला संबंध आणि रोगाच्या पूर्वानुमानाच्या दृष्टीने या संशोधनाला विशेष महत्त्व आहे. या प्रकल्पातील उद्यानविद्यावेत्ता डॉ. एस. पी. गायकवाड यांनी अर्धशुष्क परिसंस्थेत अधिक उत्पादनक्षमता व उत्कृष्ट फळगुणवत्तेसाठी गोड डाळिंबाच्या वाणांचे कार्यक्षमता मूल्यमापन या विषयावर पोस्टर सादरीकरण केले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाला. अर्धशुष्क हवामानामध्ये योग्य गोड डाळिंब वाणांची निवड, उत्पादनक्षमता आणि फळांची गुणवत्ता या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे. तसेच कीटकशास्त्र विषयातील पीएचडीचा विद्यार्थी श्री. दुर्गेश नरवाडे यांनी तापासून फळापर्यंत : डाळिंबातील कीटकनाशक अवशेषांचे एकात्मिक मूल्यांकन या विषयावर पोस्टर सादरीकरण केले. त्यांच्या प्रभावी संशोधन सादरीकरणासाठी त्यांनाही सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाळिंबातील कीटकनाशक अवशेषांचे मूल्यांकन आणि सुरक्षित डाळिंब उत्पादनाच्या दृष्टीने त्यांच्या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.
या तिन्ही संशोधकांचे संशोधन डाळिंब उत्पादनातील रोग व्यवस्थापन, वाण निवड, उत्पादन व फळगुणवत्ता तसेच सुरक्षित अन्न उत्पादन या विविध महत्त्वपूर्ण बाबींशी संबंधित आहे. त्यामुळे एकाच आंतरराष्ट्रीय परिषदेत तीन वेगवेगळ्या विषयांवर उत्कृष्ट सादरीकरणासाठी पुरस्कार मिळणे ही महात्मा फुले कृषि विद्यापीठासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे. तीन सर्वोत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारांमुळे महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पातील संशोधन कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली असून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोरडवाहू फळपिके प्रकल्पाच्या या यशाबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे व अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे