देऊळगाव रस्त्यावर उघड्यावर फेकलेले औषधे रात्रीतून गायब ; कारवाईसाठी नमुने पाठवले..

देऊळगाव रस्त्यावर उघड्यावर फेकलेले औषधे रात्रीतून गायब ; कारवाईसाठी नमुने पाठवले..
वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
नगर तालुक्यातील गुंडेगाव ते देऊळगाव रोड लगत गिरवले वस्तीपासून ओढ्यात अगदी जवळचं मुदत बाह्य औषधांचा मोठा साठा रस्त्यावर फेकून दिलेल्या अवस्थेत काही दिवसापूर्वी आढळून आला होता याबाबत परिसरात मोठी खळबळ उडाली होती. परंतु हा साठा कारवाईच्या भितीने बुधवारी पहाटेच्या सुमारास गायब करण्यात आला आहे असे येथील शेतकरी पंडित गिरवले यांच्या निदर्शनास आले असुन याबाबत त्यांनी पत्रकारांना संपर्क केला असता हा प्रकार उघडकीस आला आहे.
काही दिवसापूर्वी नगर तालुक्यातील गुंडेगाव आणि देऊळगाव मार्गावरील गिरवले वस्ती,कासार मळा जरे वस्ती परिसरात असा मुदतबाह्य औषधांचा साठा फेकून दिलेल्या अवस्थेत निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती.या भागात वारंवार असे प्रकार घडत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित केला गेला असता.
याबाबत लगेच अहिल्या नगर अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरिक्षक जावेद शेख यांनी तातडीने पाहणी करून या औषधांचा साठा पाहणी करून यांचे पुरावे म्हणून बाटल्या तपासणी साठी घेण्यात आल्या आहेत.याबाबत त्यांनी लवकरच यांचा शोध घेऊन सदर हाॅस्पिटल वर कारवाई तसेच असे प्रकार भविष्यात होणार नाहीत याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले आहे.
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात औषध विक्री दुकानात फार्मासिस्ट उपलब्ध आहेत की नाही याची तपासणी करणे तसेच डॉक्टरांकडे उपलब्ध औषधसाठ्याची (शेड्युल के) तपासणी करणे.अन्न व औषध प्रशासन (एफडीए) याबाबतची मोहीम हाती घेणार आहे, अशी माहिती शेख अन्न व औषध प्रशासन विभाग अहिल्या नगर यांनी दिली. ‘पेशंटला किरकोळ स्वरुपात द्यावयाच्या औषधांचा डॉक्टरांकडे साठा असतो. कायद्याने त्यांना ठराविक औषधे ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यांनी ही ‘शेड्युल के’ अर्थात अशा स्वरुपाची औषधे कोणत्या विक्रेत्याकडून घेतली. औषधांचा समूह क्रमांक, त्यांची संख्या यांची नोंद ठेवावी. तसेच, कोणत्या पेशंटला कोणती आणि किती औषधे दिली याची नोंदही डॉक्टरांनी त्यांच्याकडे करावी असे कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु बहुतेक हाॅस्पिटल याची अंमलबजावणी करताना दिसत नाही .
यासंदर्भात काही दिवसांपूर्वी दैनिक नवराष्ट्र,दैनिक लोकमत, दैनिक राष्ट्रप्रथम न्युज ,एस.डब्लु, न्यूज,वृत्तमालिका प्रकाशित करून याची पोलखोल केली होती.तसेच फार्मासिस्टने स्वतः दुकानात राहून औषध विक्री करावी किंवा इतर फार्मासिस्टला नोकरीवर ठेवावे. भाडोत्री अथवा सह्यापुरते फार्मासिस्टचा कामाला ठेवण्याची पद्धत स्वीकारू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.