कडाक्याच्या थंडीत गरजूंना उबदार ब्लॅंकेट वाटप स्नेहबंध फाउंडेशनने दिली मायेची उब

कडाक्याच्या थंडीत गरजूंना उबदार ब्लॅंकेट वाटप
स्नेहबंध फाउंडेशनने दिली मायेची उब
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर – तापमानाचा पारा घसरला असून कडाक्याची थंडी पडू लागली आहे. अशा कडाक्याच्या थंडीत पांघरून न घेता बाहेर रस्त्यावर झोपलेल्या गरजू व्यक्तींना स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरात सुमारे ५० जणांना ब्लॅंकेट वाटप केले.
शहरात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडू लागली आहे. शहराचा पारा १० अंश सेल्सीअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे रात्री सात वाजल्यानंतर दुकाने बंद होऊ लागली आहेत. मात्र, या परिस्थितीत निराधार, अनाथ, गरीब लोक रस्त्याच्या कडेला, दुकानाबाहेर कुडकुडत झोपत आहेत. तर काही व्यक्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक एवढेच नव्हे, तर सार्वजनिक चौकात जागा मिळेल त्या ठिकाणी रात्रीची झोप घेऊ लागले आहेत.
दरम्यान, यांची कडाक्याच्या थंडीत होणारी स्थिती लक्षात घेऊन स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी रात्रीच्या वेळी शहरातील सावेडी, पाईपलाईन रोड, दिल्लीगेट, मार्केट यार्ड, माळीवाडा, सार्वजनिक ठिकाणी तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे जाऊन कडाक्याच्या थंडीत झोपलेल्या गरजूंच्या अंगावर ऊबदार चादर पांघरून त्यांना मायेची ऊब दिली. शहरात सुमारे ५० पेक्षा अधिक गरजूंना ऊबदार चादर वाटप करण्यात आली. यावेळी सचिन पेंडुरकर, संकेत शेलार, आयुष लालबोन्द्रे, अंकुश गोत्राळ उपस्थित होते.
गरजूंच्या चेहऱ्यावरील
हास्य समाधान देऊन गेले.
थंडीच्या काळात उबदार पांघरून मिळाल्यानंतर गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान देऊन गेल्याचं स्नेहबंध सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या सामाजिक कार्याचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.



