एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम आजपासून सुरू ; लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम आजपासून सुरू ; लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :-शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण
घेणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की, ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम आजपासून म्हणजेच १६ जूनपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना त्यांचे एसटीचे मासिक पास थेट त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्येच वितरित केले जाणार आहेत.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आगारात जाऊन रांगांमध्ये उभं राहण्याची गरज भासणार नाही. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये थेट पास देण्याची ही पद्धत लाखो विद्यार्थ्यांसाठी सोयीची ठरणार आहे. या मोहिमेअंतर्गत एसटी आगार व्यवस्थापकांनी आधीच राज्यभरातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना पत्र देऊन, पास आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.
मंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की, शासन विद्यार्थ्यांना एसटी प्रवासात ६६.६६ टक्के सवलत देते, त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त ३३.३३ टक्के रक्कम भरून मासिक पास मिळतो. याशिवाय ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एसटी पास मोफत दिला जातो.
ही योजना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवास सुलभ आणि किफायतशीर करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.