जळगावात मराठी भाषेचा सुंदर सेतू, मुस्लिम बहुल वस्तीत वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम..

जळगावात मराठी भाषेचा सुंदर सेतू,
मुस्लिम बहुल वस्तीत वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम..
प्रतिनिधी : पंकज पाटील
जळगाव- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेतर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे. मुस्लिम बहुल वस्तीमध्ये मराठी वृत्तपत्रांचे वाचनालय सुरू करून भाषिक एकात्मतेचा सुंदर संदेश देण्यात आला आहे.

जळगाव शहरातून प्रकाशित होणारी सर्व प्रमुख मराठी वर्तमानपत्रे या वाचनालयात उपलब्ध करून देण्यात आली असून, परिसरातील नागरिकांमध्ये मराठी वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, दररोज सुमारे १० विविध मराठी वृत्तपत्रे वाचकांसाठी उपलब्ध राहणार असून, त्यामुळे माहितीचा आणि ज्ञानाचा एक नवा दरवाजा नागरिकांसाठी खुला झाला आहे.
या वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क अध्यक्ष यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या उत्साही वातावरणात पार पडले. कार्यक्रमात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ज्यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकाभिमुख ठरल्याचे दिसून आले.
या वेळी बोलताना जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, “मुस्लिम बहुल भागात मराठी वर्तमानपत्रांचे वाचनालय सुरू करणे हे केवळ भाषेच्या जतनासाठीच नव्हे, तर समाजातील विविध घटकांना जोडणारा एक सकारात्मक पूल आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा उपक्रम मराठी भाषा समृद्ध करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे गौरवोद्गार काढले.
हा उपक्रम केवळ वाचनाची सवय वाढवणारा नाही, तर समाजात ऐक्य, समजूतदारपणा आणि सांस्कृतिक जवळीक निर्माण करणारा ठरणार आहे. अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी मार्गदर्शक ठरतात आणि मराठी भाषेचा गौरव अधिक उंचावतात.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले ,उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, चेतन पवार, सुप्रसिद्ध कलाकार जहांगीर पेंटर,विभाग अध्यक्ष राहुल चव्हाण, विशाल जाधव,खुशाल ठाकूर, महेंद्र सपकाळे, विकास पाथरे, शाखा अध्यक्ष युसुफ खाटीक, बादशाह शहा, बहुसंख्या महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.




