राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पार्थ गायकवाड ची सलग चौथ्या वेळेस निवड.

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पार्थ गायकवाड ची सलग चौथ्या वेळेस निवड.
नगर – नुकत्याच पुणे येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्यावतीने राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग, रोलर हॉकी व इनलाइन हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटना संचलित टीम स्पीड स्केटिंग अॅकॅडमीच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. पुणे येथे दिनांक ३० व ०१ नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्यस्तर स्केटिंग रोलर हॉकी स्पर्धा व राष्ट्रीय स्तर निवड चाचणी मध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले होते. या निवड चाचणी स्पर्धेत पार्थ सतीश गायकवाड देखील सहभागी झाला होता. त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याची निवड १५ वर्षाआतील स्केटिंग रोलर हॉकी या प्रकारात ०५ ते १५ डिसेंबर दरम्यान बेंगलोर, कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. पार्थ हा अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटना संचलित टीम स्पीड स्केटिंग अॅकॅडमीची खेळाडू असून दादासाहेब गायकवाड यांचा नातू आहे. तसेच तो कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूल मधील इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे .
पार्थची राष्ट्रीय स्पर्धेत सहभागाची चौथी वेळ आहे तो यापूर्वी
विशाखापटनम आंध्र प्रदेश,
मोहली पंजाब,
बेंगलोर कर्नाटक, येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धत सहभागी झाला होता आता तो पुन्हा या वर्षी बेंगलोर, कर्नाटक येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे.सदर राष्ट्रीय स्पर्धेत पदकाची कमाई करुन आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करुन घेण्याचा त्याचा मानस आहे. वयाच्या अवघ्या अडीज वर्षांचा असल्या पासून तो स्केटिंग खेळाचा सराव बुरुडगाव रोड येथील महापालिका, विभागीय कार्यालय येथील संघटनेच्या अधिकृत प्रशिक्षण केंद्रात करत आहे.
आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली आहे. आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत त्याने चौथ्या वेळी राष्ट्रीय स्पर्धेत निवडीची कामगिरी केली आहे. सदर बाब ही जिल्हा तसेच राज्यासाठी देखील भूषणाची आहे, माननीय आमदार संग्राम भैय्या जगताप व नगरसेवक गणेशजी भोसले यांनी त्याचे विशेष कौतुक करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या. अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव आसिफ बाबुलाल शेख व इतर पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. पार्थला राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सतिश गायकवाड यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.




