एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीची सखोल चौकशी करा
दोषींवर कठोर कारवाईसह गैरप्रकारातून झालेल्या निवडी रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीची सखोल चौकशी करा
दोषींवर कठोर कारवाईसह गैरप्रकारातून झालेल्या निवडी रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट-ब परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच गैरप्रकाराचा लाभ घेऊन निवड झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित निवडी रद्द कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील असून, आई-वडिलांच्या कष्टाच्या पैशातून वर्षानुवर्षे अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र पैसे देऊन प्रश्नपत्रिका मिळवून गैरप्रकाराचा फायदा घेता येत असेल, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत का करावी, असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण, निराशा आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
“विद्यार्थ्यांना उपकार नकोत, न्याय हवा; अधिकारी होण्याचा मार्ग पैशाचा नव्हे, तर ज्ञान, गुणवत्ता आणि प्रामाणिक मेहनतीचा असला पाहिजे,” अशी भूमिका पक्षाच्या वतीने मांडण्यात आली. पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी, त्यामागील आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची भूमिका यांचा तपास करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यापूर्वीही स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असताना पुन्हा पेपरफुटीचे प्रकरण समोर येणे ही अत्यंत गंभीर व संतापजनक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे. एका परीक्षेतील गैरप्रकारामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाऊ नये, ही शासनाची जबाबदारी असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले.
या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे व युवक उपजिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले यावेळी युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे, नगर तालुका अध्यक्ष शरद पवार, नामदेव पवार, महिला शहराध्यक्ष अर्चना गायकवाड, फारुख रंगरेज, समीर पठाण, अजर शेख, रामदास ससे, चंद्रकांत पवार, राम झिने, आकाश निमसे, महेश पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


