जागतिक रक्तदाता दिनानिमित्त ‘स्नेहबंध’च्या रक्तदान जनजागृती पोस्टरचे अनावरण
रक्तदान हीच खरी सेवा, रक्तदान हेच श्रेष्ठ दान'
‘रक्तदान हीच खरी सेवा, रक्तदान हेच श्रेष्ठ दान’
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त ‘स्नेहबंध’च्या रक्तदान जनजागृती पोस्टरचे अनावरण
अहिल्यानगर / प्रतिनिधी : जागतिक रक्तदाता दिन (१४ जून) निमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने रक्तदान जनजागृती अभियानांतर्गत विशेष पोस्टरचे अनावरण करण्यात आले. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रवर अधीक्षक डाकघर अहिल्यानगर मंडल विकास पालवे, अहिल्यानगरचे आमदार संग्रामभैय्या जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. उद्धव शिंदे उपस्थित होते.
पोस्टरद्वारे “रक्तदान करा, जीवन वाचवा”, “रक्तदान सुरक्षित आहे”, “नियमित रक्तदानाने आरोग्य चांगले राहते”, “समाजात एकता व बंधुत्व वाढते” तसेच “आपले थोडेसे रक्त… कुणाच्या तरी नव्या जीवनाची सुरुवात” असा प्रभावी संदेश देण्यात आला.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे म्हणाले की, रक्तदान हे मानवतेची सेवा करणारे सर्वश्रेष्ठ दान आहे. अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया तसेच थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्ताची सातत्याने आवश्यकता असते. प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे. रक्तदानामुळे दुसऱ्याचे प्राण वाचण्यास मदत होते आणि समाजात सेवाभाव व बंधुत्वाची भावना अधिक दृढ होते. रक्तदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून युवकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.


