गुंडेगाव येथे बेकायदेशीर वृक्षतोडीला वनविभागाचे अभय ?
गुंडेगाव येथून छुप्या पद्धतीने अवैध लाकूड वाहतूक..

गुंडेगाव येथे बेकायदेशीर वृक्षतोडीला वनविभागाचे अभय ?
गुंडेगाव येथून छुप्या पद्धतीने अवैध लाकूड वाहतूक..
वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे सर्रास अवैध वृक्षतोड करून मध्यरात्री छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे.वनविभाग व वनकर्मचारी मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याने वृक्षतोड करणाऱ्यांना मोकळीकच असल्याचे दिसत आहे.गुंडेगाव येथे जंगलाचा तसेच विविध वृक्षाने समृद्ध भरलेला भाग मोठ्या प्रमाणात आहे. गुंडेगाव क्षेत्रात बाभुळ, बोरी,आंबा,ठेंभुर्णी,कडू निंब, पिंपळ, वड अनेक जातीचे वृक्ष आहेत.यात कडूनिंबाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून लाकूडतस्कर या झाडाची अवैध कत्तल करण्याचे प्रकारही करीत असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे.
वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हा विभाग नेहमीच बदनाम झाला आहे. आणि त्यातच अनेक प्रकरणांमुळे गाजणाऱ्या या विभागाच्या अब्रूची लक्तरे अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे होत असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे पुन्हा चव्हाट्यावर लटकली आहे. माहिती असुनही कारवाई न करणारे अधिकारी आणि त्यात कहर म्हणजे उपस्थित कर्मचारी मॅनेज असल्याची वक्तव्य केल्याने वनविभागात खाबूगिरी उघड्यावर आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की नगर तालुक्यातील गुंडेगावच्या रस्त्यावर असणाऱ्या तसेच शेती बांधावरील परिसरात अनेक वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करून खाजगी वाहनाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पत्रकार आगळे यांना शुक्रवारी मिळाली यावर त्यांनी प्रकाश टाकण्यासाठी खरा प्रकार काय हे ही पडताळून पाहीले आहे याबाबत ही वाहतूक पहाटेच्या वेळी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच गावात चराईबंदी, कुऱ्हाड बंदी असताना ही अद्यापही गावातील वृक्षतोडीचे प्रमाण म्हणावे तेवढे कमी झाले नसल्याचे दिसून येत आहे.यातच नगर गुंडेगाव मार्गावर टेम्पोमध्ये प्लास्टिक आणि ताडपत्रीत झाकून लाकडांची वाहतूक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नेमके ही लाकडे कोठून तोडून आणली जातात कशासाठी तोडण्यात आली कोठे जात आहेत यासह वृक्षांची कत्तल करताना वनविभागाची परवानगीही घेण्यात आली की नाही हे कळायला मार्गच उरला नसुन अगदी रहदारी असणाऱ्या भागातून लाकडाची अशी वाहतूक होत असतानाही वनविभागाचे तसेच वनकर्मचारी यांचे त्याकडे लक्ष कसे जात नाही हा सुद्धा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे…


