भरवस बोगद्याच्या दोन्ही बाजूला खोदल्या चाऱ्या
ग्रामस्थांनीच लोकवर्गणीतून सोडवली समस्या
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील भरवस येथील अंडरपास बोगद्याच्या पाण्याची समस्या अखेर परिसरातील ग्रामस्थानीच सोडवली असून बोगद्याच्या दोन्ही बाजूला चाऱ्या खोदून पाण्याचा निचरा केला आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे.
यासाठी खासदार स्मिता वाघ यांचे सहकार्य लाभले.भरवस बोगद्यात पाणी साचत असल्याने प्रवाश्यांचे अंत्यत हाल होत होते.
अमळनेरहुन गलवाडे, झाडी, भरवसमार्गे शिंदखेडा हा राज्यमार्ग होता. आजही गूगल वर राज्य मार्ग सहा भरवस गावावरून जाणारा मार्ग दिसतो. मात्र हायब्रीड ऍन्यूटी रस्त्याचे काम सुरू होताच राजकीय प्रभावाखाली हा रस्ता जैतपिर, चौबारी, पाडसेमार्गे वळवण्यात आला. रेल्वेने हा मार्ग वाहतुकीसाठी नसून नाला आहे असा फलक लावल्याने या बोगद्यात दुरुस्ती करता येत नव्हती.
प्रशासन लक्ष देत नसल्याने लोकप्रतिनिधींचा नाईलाज होता.लोकवर्गणीतून समस्या सोडविण्याचा निर्णय .अखेरीस एकलहरे, एकतास गावातील ग्रामस्थ भरवसचे सरपंच दयाराम भिल, उपसरपंच प्रा. संजय सोनवणे, मंगेश पाटील, बाळू पाटील, सुदाम अवचिते यांनी लोकवर्गणीतून समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला. बोगद्याच्या दोन्ही बाजुला चाऱ्या खोदण्यासाठी रेल्वे प्रशासनची परवानगी हवी होती.
खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वेचे सहकार्य मिळवून दिल्यानंतर पंचायत समितीचे माजी उपसभापती भिकेश पावभा पाटील यांच्या सहकार्याने जेसीबीने चाऱ्या खोदून पाणी इतरत्र वळवण्यात आले. यामुळे आता बोगद्यात पाणी साचत नसल्याने मोटरसायकलस्वार लहान वाहन चालक यांच्या समस्या सुटल्या आहेत.



