श्रीगोंदा येथे नाचणी लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

श्रीगोंदा येथे नाचणी लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
राहुरी तालुका जावेद शेख
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील राष्ट्रीय कृषि विकास योजना, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व पोळ अॅग्रो सर्विसेस, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा येथे नाचणी लागवड शेतकरी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद चवई होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणुन श्रीगोंदा येथील तालुका कृषि अधिकारी श्रीमती क्रांती चौधरी उपस्थित होत्या. यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विषयाचे विशेषज्ञ डॉ. सुनील अडांगळे, कोल्हापूर येथील नाचणी सुधार प्रकल्पाचे कनिष्ठ पैदासकार डॉ. योगेश बन व पोळ अॅग्रो सर्व्हिसेसचे राहुल पोळ उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. आनंद चवई म्हणाले की भरडधान्याचे महत्व व पोषणमूल्य लक्षात घेता शेतकरी बचत गटांनी प्रयोगशील बनणे गरजेचे आहे. हरितक्रांती झाली परंतु रासायनिक खते व किटकनाशकांचा भरमसाठ वापर यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आहे. यासाठी मानवी आरोग्याला पोषक असणारे भरड धान्य म्हणजे नाचणी, राळा अशा पिकांची गरज आहे. नाचणीमध्ये कॅलल्शीयम, लोह असे घटक मोट्या प्रमाणात असतात. कृषि विद्यापीठ नाचणीच्या मुल्यवर्धनासाठी बेकरी उत्पादन प्रशिक्षण देणार आहे म्हणून महिला बचत गटांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठ तंत्रज्ञान रेडिओ फुले कृषि वाहनीवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे त्याचा वापर करावा. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतांना श्रीमती क्रांती चौधरी म्हणाल्या की फार्मर ग्रुपवर आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकर्यांनी नैसर्गिक शेती वाढवावी. सध्या नाचणीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे विक्रीसाठी बाजारपेठ सहज उपलब्ध होईल असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. सुनील अडांगळे म्हणाले की राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत भरडधान्यांचे प्रात्यक्षिक राबविण्यात येणार असून त्याचे मुल्यवर्धन करण्यासाठी शेतकरीवर्गास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी डॉ. योगेश बन यांनी नाचणी व पौष्टिक तृणधान्य पिके, ओळख, आहारातील व लागवडीचे महत्व, शाश्वत शेती पर्याय याबद्दल मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील राज्यपुरस्कार प्राप्त शेतकरी कलगोंडा टेळे यांनी यशस्वी उन्हाळी नाचणी लागवड यशोगाथा या विषयांवर अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील अडांगळे यांनी तर आभार राहुल पोळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी 40 पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.



