महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा दुधी भोपळ्याचा सुधारीत वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारीत

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा दुधी भोपळ्याचा सुधारीत वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारीत
राहुरी विशेष वृत्तसेवा : जावेद शेख
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (भाजीपाला पिके) या योजनेची वार्षिक आढावा बैठक दि. 3 ते 5 मार्च, 2025 रोजी पंजाब कृषि विद्यापीठ, लुधियाना (पंजाब) येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी पंजाब कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सनबिर सिंग घोंसाल, दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सह संचालक डॉ. संजय सिंग, लुधियाना येथील पंजाब कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. ए.एस. धट, वाराणसी येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद-भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे प्रकल्प समन्वयक डॉ. राजेश कुमार, लुधियाना येथील पंजाब कृषि विद्यापीठाचे उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. टी.एस. धिल्लोन, दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे ए.डी.जी. डॉ. सुधाकर पांडे, वाराणसी येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद-भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एन.राय, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के.ई. लवांडे व देशातील वेगवेगळ्या राज्यातील 60 प्रकल्पाचे एकुण 400 शास्त्रज्ञ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या भाजीपाला संशोधन प्रकल्पाचे डॉ. बी.टी. पाटील, डॉ. शर्मिला शिंदे, प्रा. चिमाजी बाचकर व डॉ. शालीग्राम गांगुर्डे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या भाजीपाला लागवडीबाबत, बिजोत्पादन आणि पीक संरक्षणाबाबतच्या एकुण सहा शिफारशी मंजुर करण्यात आल्या. तसेच या आढावा बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठातील भाजीपाला संशोधन प्रकल्पाने संशोधीत केलेला दुधी भोपळ्याचा आर.एच.आर.बी.जी.-54 (फुले गौरव) हा सुधारीत वाण राष्ट्रीय पातळीवर मध्यप्रदेश, गोवा व महाराष्ट्र या राज्यांसाठी प्रसारित करण्यात आला. हा सुधारीत वाण डॉ. बी.टी. पाटील, वाय.आर. पवार व डॉ. एस.ए. अनारसे यांनी विकसीत केला आहे. या वाणाची फळे मध्यम लांबीची (27 ते 30 सें.मी.), दंड गोलाकार असून सरासरी फळांचे वजन 540 ते 550 ग्रॅम आहे. हा वाण भुरी आणि केवडा रोगास प्रतिकारक्षम असून फळांचे उत्पन्न सरासरी 413.00 क्वि./हे. मिळते अशी माहिती वरीष्ठ भाजीपाला पैदासकार तथा उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील यांनी दिली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भाजीपाला पिकांमध्ये काम करणार्या सर्व शास्त्रज्ञांचे विद्यापीठातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.
या उत्कृष्ट संशोधनासाठी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. शरद गडाख, माजी कुलगुरू कै.डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के आणि माजी संशोधन संचालक डॉ. एस.डी. गोरंटीवार, माजी विभाग प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे यांचे सतत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले. प्रकल्पाच्या या यशस्वी वाटचालीमध्ये सर्व कामगार वर्ग, शास्त्रज्ञ, शिक्षकेतर कर्मचारी यांचा महत्वाचा सहभाग असल्याचे प्रतिपादन डॉ. बी.टी. पाटील यांनी केले.