Breaking
ब्रेकिंग

सावंत परिवाराचा शंभर वर्षांचा बैलपोळा उत्साहात साजरा; २१ बैलजोड्यांचा पारंपरिक पद्धतीने पूजन व लग्न

0 8 6 5 2 1

सावंत परिवाराचा शंभर वर्षांचा बैलपोळा उत्साहात साजरा; २१ बैलजोड्यांचा पारंपरिक पद्धतीने पूजन व लग्न

प्रतिनिधी: नितीन परदेशी

करमाळा: दि. १३/ शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील सदस्याचे स्थान दिले जाते. वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून बैलपोळा साजरा केला जातो.

आधुनिक युगात शेतीचे मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले असले, तरी ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या या पारंपरिक सणाचे महत्त्व आजही कायम आहे. याच परंपरेचा जागर सावंत परिवाराने करमाळा शहरात यंदाही मोठ्या उत्साहात साजरा केला. दुष्काळी परिस्थितीचे सावट, पाणी व चाऱ्याची निर्माण झालेली समस्या आणि शेतीतील वाढता यांत्रिकीकरणाचा वापर या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील सावंत परिवाराने सुमारे शंभर वर्षांपासून जपलेली सार्वजनिक बैलपोळ्याची परंपरा यंदाही तितक्याच उत्साहाने साजरी केली. चार पिढ्यांपासून सुरू असलेल्या या परंपरेत यंदा २१ बैलजोड्या तसेच गोमातांची वाजतगाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन, सजावट, मिरवणूक आणि त्यानंतर ‘बैलांचे लग्न’ असा पारंपरिक सोहळा पार पडला.

सावंत परिवाराच्या सार्वजनिक बैलपोळ्याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्व. अनंतराव आबा सावंत यांनी या सार्वजनिक बैलपोळ्याची सुरुवात केली. त्यानंतर स्व. सुभाष ( आण्णा) सावंत व त्यांच्या बंधूंनी ही परंपरा पुढे नेली. त्यानंतर विठ्ठल (आप्पा) सावंत यांनी ही परंपरा पुढे नेली. विठ्ठल (आप्पा) सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हमाल पंचायत अध्यक्ष व संचालक आदिनाथ कारखाना अॅड. राहुल सावंत, नगरसेवक संजय सावंत व नगरसेवक सुनील सावंत यांनी या परंपरेत सातत्य ठेवले. सध्या पै. किरण सावंत यांच्या पुढाकारातून हा पारंपरिक उत्सव पुढे नेला जात आहे. त्यामुळे बैलपोळा हा सावंत परिवारासाठी केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम न राहता पूर्वजांनी सुरू केलेल्या परंपरेचे जतन करण्याचा सोहळा ठरला आहे.

बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांची खांदे मळणी करण्याची पारंपरिक प्रथा पार पडली. पोळ्याच्या दिवशी सकाळपासूनच बैलांना स्वच्छ स्नान घालून त्यांची सजावट करण्यात आली. शिंगांना विविध रंग लावण्यात आले, अंगावर आकर्षक झूल चढविण्यात आली, गळ्यात घुंगरू व विविध अलंकार घालण्यात आले. फुलांच्या माळांनी सजविलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. गुरुवारी (१० सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास सावंत परिवाराच्या वतीने बैलजोड्या आणि गोमातांची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीमुळे करमाळा शहरातील वातावरणात उत्साह निर्माण झाला. सजविलेल्या बैलजोड्या, त्यांच्यासोबत सहभागी झालेले शेतकरी व नागरिक आणि गोमातांमुळे मिरवणुकीला पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचा साज लाभला.

मिरवणुकीनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास सावंत गल्ली येथील सावंत परिवाराच्या निवासस्थाना समोर बैलजोड्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. बैलांच्या कपाळाला कुंकू-हळदीचा टिळा लावण्यात आला. फुले व हार अर्पण करून त्यांची पूजा करण्यात आली. बैलांना नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने’ बैलांचे लग्न ‘ लावण्याचा सोहळा पार पडला. या वेळी उपस्थित नागरिकांनीही बैलांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या सार्वजनिक बैलपोळा सोहळ्यात सावंत परिवारासह करमाळा शहर व परिसरातील शेतकरी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल-तोलार तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले. त्यामुळे हा उत्सव सर्वसमावेशक स्वरूपाचा ठरला. बैलपोळ्यानिमित्त एकत्र आलेल्या नागरिकांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. ग्रामीण जीवनाशी जोडलेली संस्कृती, परंपरा आणि पशुधनाविषयीची आत्मीयता या निमित्ताने पुन्हा अनुभवायला मिळाली.

बैलपोळा म्हणजे केवळ बैलांना सजवून मिरवणूक काढणे नव्हे, तर शेती, शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्यातील घट्ट नाते अधोरेखित करणारा सण आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना या दिवशी विश्रांती देऊन त्यांचा सन्मान केला जातो. शेतकऱ्याच्य जीवनातील या महत्त्वपूर्ण साथीदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा या सणामुळे कायम राहते.

पूजा व पारंपरिक विधीनंतर उपस्थितांसाठी पुरणपोळीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले. कुटुंबीय, शेतकरी, व्यापारी, नागरिक आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या मान्यवरांनी या भोजनाचा लाभ घेतला. त्यामुळे धार्मिक विधींबरोबरच सामाजिक सलोखा आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.

दुष्काळाच्या कठीण परिस्थितीतही सावंत परिवाराने शंभर वर्षांची परंपरा कायम ठेवत साजरा केलेला बैलपोळा हा करमाळ्याच्या सांस्कृतिक वैभवाची आणि ग्रामीण जीवनाशी असलेल्या घट्ट नात्याची प्रचिती देणारा ठरला. पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा पुढील पिढीकडे सोपविताना सावंत परिवाराने पशुधनाविषयीचा आदर आणि शेतकरी संस्कृतीची जपणूक करण्याचा संदेश या उत्सवातून दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे