वृक्ष संवर्धन – काळाची गरज

वृक्ष संवर्धन – काळाची गरज
वृक्ष हे निसर्गाचे अनमोल वरदान असून मानवी जीवनाचा आधार आहेत. वृक्षांपासून आपल्याला श्वास घेण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळतो, ते हवेतील विषारी कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन हवा शुद्ध करतात, पाऊस पडण्यासाठी मदत करतात आणि जमिनीची धूप थांबवतात. वृक्षांमुळे आपल्याला फळे, फुले, लाकूड, सावली आणि अनेक औषधी वनस्पती मिळतात, तसेच असंख्य पक्षी आणि प्राण्यांना त्यांच्यावर निवारा मिळतो.
परंतु आज वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड होत आहे. या वृक्षतोडीमुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे, जागतिक तापमानात प्रचंड वाढ होत आहे, पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळ पडत आहे आणि निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडत आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा आणि पाणी देखील मिळणार नाही.
म्हणूनच आज वृक्ष संवर्धन ही काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. फक्त झाड लावून चालणार नाही, तर लावलेल्या झाडाचे संगोपन करणे, त्याला पाणी देणे आणि मोठे करणे हे खरे संवर्धन आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या वाढदिवसाला, सणाला एक तरी झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत आणि सरकारने एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवावी आणि वृक्षतोडीवर कडक कायदे करावेत. लक्षात ठेवा, वृक्ष असतील तरच आपण आहोत. वृक्ष लावूया, वृक्ष जगवूया आणि आपले भविष्य सुरक्षित करूया, कारण वृक्ष संवर्धन हाच जीवन संवर्धनाचा खरा मंत्र आहे.
= लेखक=
प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर.
भ्रमणध्वनी=९६०४७९७३१६



