Breaking
ब्रेकिंग

जागतिक आदिवासी दिनी आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला 40 पुस्तकांची अनोखी भेट ;  संतोष कानडे यांचा वाचन संस्कृती जोपासण्याचा उपक्रम

0 8 6 5 2 0

जागतिक आदिवासी दिनी आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला 40 पुस्तकांची अनोखी भेट ;  संतोष कानडे यांचा वाचन संस्कृती जोपासण्याचा उपक्रम

विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न

राष्ट्रपुरुषांच्या जीवनावरील पुस्तक वाचनाने सुसंस्कृत व सृजनशील विद्यार्थी घडावेत -संतोष कानडे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)-

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून न्यू आर्टस्‌ कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगरचे प्रशासकीय कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांनी आदिवासी शासकीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थीनींसाठी 40 पुस्तकांचा संच भेट दिला. विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजावी तसेच ऐतिहासिक काळातील राष्ट्रपुरुषांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, अहिल्यानगरच्या वतीने आयोजित जागतिक आदिवासी क्रांती दिनाच्या कार्यक्रमात हा पुस्तक संच आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल जयश्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या माहेश्‍वरी गावीत, भगवान राऊत, आदिवासी सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये पुस्तकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पुस्तकांच्या माध्यमातून केवळ ज्ञान मिळत नाही, तर विचार करण्याची क्षमता, कल्पनाशक्ती, चिकित्सक दृष्टी आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते. त्यामुळे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थीनींना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे संतोष कानडे यांनी सांगितले.
सध्याच्या मोबाईल आणि सोशल नेटवर्किंगच्या युगात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा वेळ विविध सोशल मीडिया ॲप्सच्या वापरामध्ये जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेली वाचनाची सवय आणि पुस्तकांशी असलेले नाते हळूहळू कमी होत असल्याची खंत कानडे यांनी व्यक्त केली. मोबाईलचा योग्य वापर करतानाच विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनासाठी नियमित वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
इतिहासातील राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, विचारवंत आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनकार्याची माहिती पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते. अशा वाचनातून विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा मिळते, प्रेरणा मिळते आणि समाजाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. त्यामुळे विद्यार्थिनींनी उपलब्ध करून दिलेल्या पुस्तकांचा नियमितपणे उपयोग करून वाचनाची सवय अंगीकारावी, असे आवाहनही कानडे यांनी केले.
पुस्तक वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. वाचन करणारे विद्यार्थी अधिक सुसंस्कृत, संवेदनशील, सृजनशील आणि विचारशील बनतात. आजच्या डिजिटल युगात पुस्तक वाचनाची संस्कृती जपणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलसोबत पुस्तकही असावे आणि त्यांच्या मनात ज्ञानाची भूक निर्माण व्हावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे