नशामुक्त पिढी हीच राष्ट्राची ताकद – डॉ. उद्धव शिंदे व्यसनमुक्त समाजासाठी स्नेहबंधचा पुढाकार


नशामुक्त पिढी हीच राष्ट्राची ताकद – डॉ. उद्धव शिंदे
व्यसनमुक्त समाजासाठी स्नेहबंधचा पुढाकार
प्रतिनिधी : आसावरी वायकर
अहिल्यानगर : आजची युवा पिढी नशेच्या विळख्यात अडकू नये यासाठी वेळेत जनजागृती होणे आवश्यक आहे. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि समाजाने एकत्र येऊन अमली पदार्थांविरोधात ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन स्नेहबंध फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
स्नेहबंध सोशल फौंडेशन, अहिल्यानगर यांच्या वतीने अमली पदार्थांविरुद्ध लढा व व्यसनमुक्ती धोरणाची सुरुवात करण्यात आली. या जनजागृती मोहिमेचा प्रारंभ भिंगार येथील श्रीमती अॅबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच भिंगार स्पोर्ट्स क्लब येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास पर्यवेक्षिका कविता शिंदे, शिक्षकवृंद, क्लबचे प्रशिक्षक विठ्ठल काळे व शंकर औरंगे व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. उद्धव शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट केले. व्यसनामुळे वैयक्तिक जीवन, कुटुंब व समाज कसा उद्ध्वस्त होतो, याची उदाहरणांसह माहिती देत विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अमली पदार्थविरोधी जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पोस्टरवर “स्वस्थ जीवन, सुंदर भविष्य – नशेपासून दूर रहा”, “जीवनाला हो म्हणा, अमली पदार्थांना नाही म्हणा”, “मादक द्रव्याची नशा – अनमोल जीवनाची दुर्दशा” अशा प्रभावी घोषणा आहेत.



