पारनेरचे आरोग्यदूत उतरले मैदानात
पारनेरचे आरोग्यदूत उतरले मैदानात
प्रतिनिधी : संजय वायकर
पारनेर : खेळामुळे आरोग्य चांगले राहतेच पण सांघिक भावना वाढते या भावनेतून पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व नगर मधील न्यूक्लियस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या सयुंक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील चारही झोन मधील डॉक्टरांसाठी पारनेर डॉक्टर प्रीमियर लीग चे ३० नोव्हेंबर रोजी साईदीप क्रिकेट अकैडमी,वाकोडी फाटा येथे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी स्पर्धेचे उदघाटक म्हणून पद्मश्री श्री पोपटराव पवार तसेच प्रमुख पाहुणे डॉ . गोपाळ बहुरूपी पाटील उपस्थित होते तसेच पारनेर तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टर उपस्थित होते .यावेळी श्री पवार यांनी मनोगत व्यक्त करताना ही डॉक्टरांसाठीची तालुकास्तरीय बहुदा पहिलीच स्पर्धा असावी असा विश्वास व्यक्त केला , संघटनेच्या सर्व सभासदांच्या एकीचे डॉ . गोपाळ बहुरूपी यांनी कौतुक केले.सध्याच्या व्यावसायिक स्पर्धेच्या काळात पारनेर तालुक्यात सर्व वैद्यक व्यवसायिकांमध्ये असणारे परस्पर सामंजस्य कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा त्यांनी केला.
चारही झोनमधील पारनेर टायगर्स ढोकेश्वर चॅलेंजर्स , निघोज सुपरकिंग्स आणि भालवणी वॉरियर्स यांच्यात चुरशीचे सामने पाहायला मिळाले.स्पर्धेत सर्व वयोगटातील डॉक्टर्स सहभागी झाले होते.महिला सदस्याही प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.अंतिम सामना निघोज सुपरकिंग्स विरुद्ध ढोकेश्वर चॅलेंजर्स यांच्यात रंगला व निघोज संघाने बाजी मारत विजेतेपद संपादन केले तर ढोकेश्वर चॅलेंजर्स उपविजेता ठरला. डॉ . अश्विन खंदारे मालिकावीर ठरले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून डॉ . नितीन रांधवन तर उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून डॉ सुनील कदम यांचा गौरव करण्यात आला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले डॉ सचिन साळे .न्युक्लियस हॉस्पिटलचे संचालक डॉ गोपाळ बहुरूपी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले .
संघटनेचे अध्यक्ष डॉ . भाऊसाहेब खिलारी ,सचिव डॉ . संदीप तांबे ,उपाध्यक्ष डॉ . सोमेश्वर आढाव व खजिनदार डॉ . जितेंद्र खामकर व सर्व कार्यकारीणी सदस्य यांनी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करून आपल्या सहकाऱ्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न केले. अध्यक्ष डॉ . खिलारी यांनी आभार व्यक्त केले.