चायना मांजा बंदी जनजागृतीसाठी ‘स्नेहबंध’चा पुढाकार

चायना मांजा बंदी जनजागृतीसाठी ‘स्नेहबंध’चा पुढाकार
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर : मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर चायना मांजामुळे होणारे संभाव्य अपघात, जीवितहानी व पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने चायना मांजा बंदी जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
या पोस्टरचे अनावरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या हस्ते स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. कृषी अधिकारी बोराळे म्हणाले, चायना मांजा धारदार व घातक आहे. त्याचा वापर मानवी जीवन, पशु-पक्षी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरतो. पतंग उडवताना हाताला गंभीर इजा होण्यासह तुटलेला मांजा रस्त्यावर पडल्यास दुचाकीस्वार, पादचारी व लहान मुले अडकून अपघात होतात. हा मांजा विद्युत वाहिन्यांवर अडकल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या व मालमत्तेच्या नुकसानीच्या घटनाही घडतात.
“चायना मांजा हा केवळ बेकायदेशीरच नाही तर जीवघेणाही आहे. मानवी जीवन, पशु-पक्षी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी चायना मांजा पूर्णतः टाळणे आवश्यक आहे, असे बोराळे म्हणाले.
सुरक्षित व पर्यावरणपूरक सण साजरा करावा
चायना मांजामुळे पशु-पक्ष्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होत असून पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चायना मांजा बंदीच्या निर्णयाला नागरिकांनी सहकार्य करावे व सुरक्षित व पर्यावरणपूरक सण साजरा करावा, असे आवाहन ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे त्यांनी केले.



