गुंडेगाव येथे श्री तुकाईदेवी मंदिराच्या कलशारोहणानिमित्त पंचदिनी धार्मिक सोहळा…

गुंडेगाव येथे श्री तुकाईदेवी मंदिराच्या कलशारोहणानिमित्त पंचदिनी धार्मिक सोहळा…
एस डब्ल्यू न्यूज वार्ता
गुंडेगाव (ता. जि. अहिल्यानगर) :- गुंडेगाव येथील श्रद्धास्थान असलेल्या श्री तुकाईदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. हे काम नुकतेच पूर्णत्वास आले असून मंदिराच्या कलशारोहणानिमित्त १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पंचदिनी धार्मिक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
श्री तुकाईदेवी मंदिर जीर्णोद्धार समिती व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून उभारण्यात आलेले हे मंदिर शास्त्रोक्त, तांत्रिक व आधुनिक संगमरवरी दगडांचा वापर करून कलाकुसरतेने साकारण्यात आले आहे. गगनचुंबी भव्य व आकर्षक मंदिर परिसरात भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
या सोहळ्यानिमित्त बुधवार ते शनिवार दरम्यान दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत नामांकित कीर्तनकारांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. किर्तना नंतर दररोज रात्री ९ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत कलशारोहण कार्यक्रम व काल्याचे कीर्तन होणार असून दुपारी १२ नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने आयोजित या धार्मिक सोहळ्यास गुंडेगाव तसेच पंचक्रोशीतील सर्व माता-भक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन तुकाई मळा जीर्णोद्धार समिती व समस्त ग्रामस्थ गुंडेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.



