अहमदनगर सेमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये जागतिक होमिओपॅथी दिवस उत्साहात साजरा

अहमदनगर सेमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये जागतिक होमिओपॅथी दिवस उत्साहात साजरा
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर, दि. १० एप्रिल / जागतिक होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २७१ व्या जयंतीनिमित्त अहमदनगर येथील सेमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये जागतिक होमिओपॅथी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळी व होमिओपॅथीवरील मॉडेल्स सादर केली. तसेच विद्यार्थिनींनी होमिओपॅथीच्या विविध पैलूंवर प्रभावी सादरीकरण केले.

या कार्यक्रमासाठी दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुदाम देशमुख व दैनिक सकाळचे संपादक मुरलीधर कराळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे विध्यार्थी आदित्य वणवे व रेणुका चकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर डॉ. शकील सय्यद यांनी होमिओपॅथी ही आधुनिक काळातील नव्या आजारांवर प्रभावी उपचारपद्धती असल्याचे सांगितले.
डॉ. सोमेश्वर नरुटे यांनी विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य वापर करत पुस्तके व अनुभवातून ज्ञान मिळवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. वैशाली काकडे यांनी ताणतणाव व बदलत्या जीवनशैलीमुळे जनुकीय स्तरावर होणाऱ्या बदलांमुळे आजार निर्माण होतात व त्यावर होमिओपॅथी प्रभावी ठरते, असे नमूद केले. डॉ. विद्या देशमुख यांनी होमिओपॅथी क्षेत्रातील अनुभव सांगत या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अनेक नव्या संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी होमिओपॅथीच्या सर्वसमावेशक गुणधर्मांमुळे ती कोणत्याही आजारासाठी प्रथम प्राधान्याची उपचारपद्धती म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले.
नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथीच्या निर्देशानुसार वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप पवार यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. दिलीप पवार म्हणाले की, “कोणतीही सामाजिक किंवा राजकीय पार्श्वभूमी नसतानाही समाजाच्या पाठबळामुळे यश मिळवणे शक्य झाले.”
प्रमुख पाहुणे सुदाम देशमुख यांनी होमिओपॅथी ही समाजासाठी सशक्त व सकारात्मक परिणाम देणारी उपचारपद्धती असल्याचे सांगितले, तर मुरलीधर कराळे यांनी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी होमिओपॅथीची कास धरण्याचे आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. भूषण अनभुले यांनी परंपरा व नव्या संशोधनाची सांगड घालत विद्यार्थ्यांनी संवेदनशील व कुशल डॉक्टर बनण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पूनम अनभुले व डॉ. सोनाली वारे यांनी केले, तर डॉ. गौरव सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.



