गुंडेगाव येथे तुकाईमाता मंदिरात महिलांचे झांज पथकाने परीसर दुमदुमून गेला..*
*गुंडेगाव येथे तुकाईमाता मंदिरात महिलांचे झांज पथकाने परीसर दुमदुमून गेला..*
गुंडेगाव प्रतिनिधी : संजय भापकर
गुंडेगावाच्या मध्यभागी असलेल्या तुकाई देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे, या देवी विषयीची एक दंतकथा प्रसिद्ध आहे. चुंबळकर घराण्यातील पूर्वज रंगनाथ बाबाजी शिंपी यांनी यमाई देवीवर असलेल्या अपार भक्तीमुळे बारा वर्षे पायी राशीन येथे वारी केली होती. आजही हा चुंबळकर परिवार नवरात्रात नऊ दिवस पूजाअर्चा करून परंपरा जपतो. नवरात्रोत्सवात दररोज आरती व धार्मिक कार्यक्रम होत असतात दसऱ्याच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. तुकाईमातेची भव्य मिरवणूक अत्यंत उत्साहात काढण्यात येते. यावेळी मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून झांज पथकांच्या दमदार वाजतगाजत तालांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, देवीचे जयघोष, “जय तुकाईमाता”च्या घोषणांनी गाव भाविक रंगून गेले.
या झांज पथकात सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या अद्भुत तालबद्ध सादरीकरणातून देवीभक्तांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक तालामध्ये भक्ती, शक्ती आणि नारीशक्तीचा संगम दिसून आला. खऱ्या अर्थाने आदिशक्ती, आदिमाया अंबाबाई स्वतः या झांज पथकात सहभागी झाल्याचा भास उपस्थित भाविकांना होत होता.
मिरवणुकीच्या मार्गावर तुकाईमळा जिल्हा परिषदेच्या शिक्षिका सुमित्रा छजलाने व शिक्षक संजय शेलार सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा हराळ,नमिता जावळे, उज्वला हराळ,निता हराळ, सविता जवक,मनिषा जवक,विद्या जवक, शुभांगी कुताळ, भक्ती शिंदे,कोमल भिसे,रेखा भापकर,स्वाती भापकर, रुपाली कोतकर, जयश्री शिर्के, रुपाली शिर्के आदि महिलांच्या सहभागामुळे एक वेगळेच आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. ढोल, ताशे, लेझीम सोबत झांज पथकाची जोड अनोखी ठरली. गावातील व आसपासच्या भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या दैवी क्षणाचे साक्षीदार झाले.
गावातील ज्येष्ठ मंडळींनी सांगितले की, “अशा झांज पथकामुळे नवरात्र उत्सवाला वेगळेच तेज प्राप्त होते. हे पथक म्हणजे नारीशक्तीचे जिवंत उदाहरण आहे.”भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या मिरवणुकीमुळे गुंडेगावच्या नवरात्र उत्सवात एक अनोखी ऐतिहासिक भर पडल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.



