कृषी विज्ञान केंद्र दहिगाव- ने येथे एकात्मिक शेती पद्धती विषयावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
कृषी विज्ञान केंद्र दहिगाव- ने येथे एकात्मिक शेती पद्धती विषयावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
प्रतिनिधी : प्रविण देशमुख
श्री मारुतराव घुले पा. शिक्षण संस्थेचे व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आयोजित कृषी विज्ञान केंद्र,दहिगाव ने येथे ग्रामीण युवकांसाठी नुकताच एकात्मिक शेती पद्धती या विषयावर पाच दिवसीय प्रशिक्षण वर्ग 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात कार्यक्षेत्रातील 34 युवा शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत प्राप्त माहितीबद्दल समाधान व्यक्त केले.
केंद्राचे कामकाज संस्थेचे अध्यक्ष मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थींना एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पीक पद्धती बरोबर फळे, भाजीपाला, गाई, म्हशी, शेळीपालन, कुक्कुटपालन, नैसर्गिक व सेंद्रिय शेती, आधुनिक ऊस शेती व ऊस रोपवाटिका, पाण्याचा काटेकोर वापर, एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, सोलार आधारित शेती तसेच शेतकऱ्यांजवळ उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा योग्य उपयोग करून अधिक नफा मिळविणे या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. एस. एस. कौशिक, श्री. माणिक लाखे, श्री. नारायण निबे, श्री. नंदकिशोर दहातोंडे, इंजि. राहुल पाटील, डॉ. चंद्रशेखर गवळी, श्री. प्रकाश बहिरट, श्री. प्रकाश हिंगे यांनी तसेच प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक श्री सचिन बडधे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणार्थींना एकात्मिक पद्धतीने शेती करणाऱ्या प्रगतशील शेती करणारे भावी निमगाव येथील शेतकरी श्री अभिजीत तोरमड, डॉ. शंकर जाधव, शेवगाव ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनीस व श्री नामदेव चेडे यांच्या शेतास भेट भेटी देण्यात आल्या. रांजणी येथील साईराम ऍग्रोबायोटेक या गांडूळ खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पात भेट देण्यात आली यावेळी श्री संजय तनपुरे यांनी गांडू पत निर्मिती व व्यवसाय याबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षण वर्गाचे समारोपावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. अशा प्रकारचे प्रशिक्षण वारंवार व्हावेत, कारण यापुढे शेती पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे व प्रशिक्षणापासून आम्हाला नक्की फायदा होईल अशी भावना यावेळी काही प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली.
*प्रत्येक पिढीला जमीन कमी कमी होत चालली आहे, बदलते हवामान यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसत आहे, तसेच यापुढे प्रचलित पिके घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही यावर एकात्मिक पद्धतीने शेती करणे हाच एक उत्तम पर्याय ठरू शकतो असे यावेळी श्री सचिन बडधे, प्रशिक्षण समन्वयक यांनी आवर्जून नमूद केले*



