जे.एस.एम. व लाॅ काॅलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
जे.एस.एम. व लाॅ काॅलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
गुलाबी थंडीत गुलाबी वातावरणात सुरू झालेले विविध डेज, स्पर्धा, उपक्रम व संगीत, नृत्य, नाट्य यांनी नटलेले सांस्कृतिक कार्यक्रम यांनी सजलेले जे. एस. एम. कॉलेज तसेच लाॅ काॅलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उन्मेष व विधीतरंग आज संपन्न झाले.
या स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतमभाई पाटील उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लाॅ च्या प्रभारी प्राचार्य अॅड. नीलम हजारे हे उपस्थित होते.
आनंदी जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन यावेळी मा.अॅड. गौतमभाई पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जणू पर्वणीच असते. विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचा आविष्कार करता यावा यासाठी महाविद्यालयाने वैविध्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने केले होते. चित्रकला, हस्तकला, पोस्टर मेकिंग, रांगोळी, मेहंदी, सुडोकू, सापशिडी, विज्ञान प्रदर्शन, बीजीएमआय अंडरडॉग्स कॉम्पिटिशन, पाककला, स्केचिंग यासारख्या स्पर्धांमध्ये दोन्ही महाविद्यालयांचे विद्यार्थी गेले काही दिवस रमून गेले होते. त्याच सोबत रोज डे, साडी डे, बाॅलिवूड थीम डे, पिंक डे असे कॉलेज डेज साजरे करत विद्यार्थ्यांनी या संमेलनाचा मनमुराद आनंद लुटला. या सर्व स्पर्धांचे उद्घाटन दि. २१/१२/२०२४ रोजी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष मा. डाॅ. साक्षी पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाचे कार्यवाह मा. श्री. गौरव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डाॅ. आदिती साष्टे, असो. प्रोफेसर, के. ई. एस. सी. एच. केळूसकर होमिओपॅथिक मेडिकल काॅलेज, अलिबाग तसेच श्री. सचिन कांबळे, सहा. शिक्षक, को.ए.सो.लोकनेते ॲड.दत्ता पाटील हायस्कूल बेलोशी यांनी परिक्षक म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली. त्यांचा जनता शिक्षण मंडळातर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. या सर्व स्पर्धांमध्ये व नृत्य, नाट्य, गायन या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारितोषिक प्राप्त विजेत्या विद्यार्थ्यांना आज मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. आपण केलेल्या मेहनतीचे फळ पारितोषिक स्वरूपात स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. “जे.एस.एम. महाविद्यालयाने आम्हाला नेहमीच भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि त्यामुळेच तालुका, जिल्हा व विद्यापीठ स्तरावर आम्हाला स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवता येते असे मत यावेळी विद्यापीठस्तरावर फोटोग्राफी स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त करणाऱ्या कु. वेदांत रोटकर याने व्यक्त केले.
हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष प्रा. गौरी लोणकर व डाॅ. संदीप घाडगे, उपकार्याध्यक्ष प्रा. जे. डी. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्वेता पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. नीलम म्हात्रे, विद्यार्थी परिषद सचिव अथर्व भगत व श्रद्धा वैशंपायन दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व या स्नेहसंमेलनाचा केंद्रबिंदू असलेले विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.