शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या हृदयातील स्वप्नांना आकार देणारा व्यक्ती- महेश पाडेकर
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या हृदयातील स्वप्नांना आकार देणारा व्यक्ती- महेश पाडेकर
राहुरी तालुका जावेद शेख
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नवलेवाडी येथील विद्यार्थ्यांचे लाडके व गुणी शिक्षक भरत गोविंद सदगीर यांचा निरोप समारंभ पालकांच्या वतीने अत्यंत भावनिक वातावरणात मोठ्या उत्साहाने पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन स्कूल कमिटीचे अध्यक्ष विक्रम मंडलिक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून निसर्ग व सामाजिक परिवर्तन प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्धीप्रमुख महेश पाडेकर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड, माजी मुख्याध्यापक आवारी, पालकवर्ग, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ वाजे यांनी केले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी जगताप मॅडम यांनी सुरेखरीत्या पार पाडली.
विद्यार्थ्यांनी कवितांतून, मनोगतातून व गीतांमधून आपल्या सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पालक व मान्यवरांनी मनोगतातून नमूद केले की, “सदगीर सरांनी केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवले नाहीत, तर संस्कार, प्रामाणिकपणा व जीवनमूल्ये रुजवून विद्यार्थ्यांच्या हृदयातील स्वप्नांना आकार दिला.”
समारोपाच्या क्षणी डोळ्यांत अश्रू तर मनात अभिमान घेऊन उपस्थितांनी सरांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. गावच्या इतिहासात स्मरणीय ठरावा असा हा निरोप समारंभ खऱ्या अर्थाने भावनिक, अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरला.



