शहर स्थापनेदिनानिमित्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना भुईकोट किल्ल्याची फोटो फ्रेम भेट
शहर स्थापनेदिनानिमित्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना भुईकोट किल्ल्याची फोटो फ्रेम भेट
‘स्नेहबंध’ फौंडेशनचा सलग ११ वर्षांपासून उपक्रम ; शहराच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा संदेश
अहिल्यानगर : सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर शहराचा ५३७ वा स्थापना दिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना अहिल्यानगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची आकर्षक फोटो फ्रेम भेट देण्यात आली. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते ही भेट देण्यात आली.
यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ‘स्नेहबंध’च्या वतीने शहर स्थापनेदिनानिमित्त गेल्या ११ वर्षांपासून विविध सरकारी कार्यालये, अधिकारी तसेच सामाजिक संस्थांना भुईकोट किल्ल्याची फोटो फ्रेम भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी बोलताना डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “अहिल्यानगर शहराला समृद्ध इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि वैभवशाली वारसा लाभलेला आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक ओळख जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नवीन पिढीला शहराच्या इतिहासाची माहिती व्हावी आणि शहराच्या वारशाबद्दल अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.”
तसेच, “अहिल्यानगर शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त व्हावे, शहरातील ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व्हावे आणि शहर विकासाच्या नव्या उंचीवर जावे, अशी अपेक्षा आहे,” असेही डॉ. शिंदे यांनी व्यक्त केले.



