साता समुद्रापार जुळल्या ‘रेशीमगाठी’…; व्हिएतनामची कन्या होणार संगमनेरची सून!
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार थाटात होणार मंगल परिणय

साता समुद्रापार जुळल्या ‘रेशीमगाठी’…; व्हिएतनामची कन्या होणार संगमनेरची सून!
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार थाटात होणार मंगल परिणय
संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावचे बाबाजी भालेराव यांचे सुपुत्र संदीप बाबाजी भालेराव आणि व्हिएतनामची कन्या शर्वरी यांचा अनोखा आंतरराष्ट्रीय विवाह सोहळा दिमाखात साजरा होत आहे.
प्रेमाला जात,धर्म,देशांच्या सीमा यांचे कुठलेही बंधन नसते.याची प्रचीती पुनश्च आली.संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील तरुणाचे व्हिएतनामच्या तरुणीशी प्रेमाचे बंध जुळले.
त्यांचे प्रेम बहरले अन् ते विवाहाच्या रेशीमबंधनात अडकले.त्यामुळे व्हिएतनामची कन्या हिवरगाव पावसाची सून होणार आहे.भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविणारा अनोखा विवाह सोहळा उद्या वसंत लॉन्स संगमनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
बाबाजी हनुमंता भालेराव रा. हिवरगांव पावसा ता.संगमनेर जि.अहिल्यानगर यांचे चिरंजीव संदीप याने अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर संदीप याने मोक्ष योगा स्कूल समनापुर येथे योगा टीचर डिप्लोमा कोर्स पूर्ण केला.आणि दीड वर्ष गोवा येथील स्टुडिओमध्ये योगा टीचर म्हणून नोकरी केली. त्यानंतर सन 2019 मध्ये संदीप थेट व्हिएतनामला योगा टीचर म्हणून स्टुडिओ मध्ये नोकरी करू लागला.तेथे नुयेन वन तुंग यांची मुलगी शर्वरी ही गव्हर्नमेंट ऑडिटर यांच्या बरोबर ओळख झाली.ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि कुटुंबीयांच्या परवानगीने दोघांचा 11 ऑक्टोबर 2025 रोजी व्हिएतनाम येथे बौद्ध पद्धतीने विवाह झाला.भालेराव कुटुंबीयांच्या आग्रहानुसार भारतीय बौद्ध पद्धतीने नुसार संगमनेर येथे मंगल परिणय सोहळ्याचा प्रस्ताव ठेवला.
त्यांच्या व्हिएतनामच्या या सोयऱ्यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला. काल वधू शर्वरी व तिचे आई-वडील व इतर कुटुंबीयांसह
व्हिएतनामचे वऱ्हाड संगमनेरला दाखल झाले आहे.
भारतीय बौद्ध संस्कृती व परंपरेनुसार उद्या वसंत लॉन्स संगमनेर येथे मंगल परिणय संपन्न होणार आहे.या अनोख्या आंतरराष्ट्रीय विवाह सोहळ्यामुळे भारतीय बौद्ध संस्कृती व व्हिएतनामच्या संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.या दिमाखदार सोहळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते, भाजपाचे जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे,सरपंच सुभाष गडाख यांच्या सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.



