मानवी साखळीतून साकारला भारताचा भव्य नकाशा

*मानवी साखळीतून साकारला भारताचा भव्य नकाशा*
*ड्रोन चित्रीकरणाने वेधले लक्ष*
राहुरी तालुका जावेद शेख
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील अ.ए. सो.च्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून भारताच्या एकात्मतेचा आणि देशभक्तीचा संदेश देणारा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
विद्यालयाचे शाळा समितीचे को-चेअरमन हेमंत मुथा यांच्या प्रोत्साहनातून विद्यार्थ्यांनी या अभिनव उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मानवी साखळी तयार करून भारताचा भव्य नकाशा साकारला. या उपक्रमाचे ड्रोनच्या साहाय्याने चित्रीकरण करण्यात आले. आकाशातून टिपण्यात आलेल्या या दृश्यातून भारताचा नकाशा आणि विद्यार्थ्यांची एकजूट प्रभावीपणे अधोरेखित झाली.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी देशपांडे, उपमुख्याध्यापिका वनिता बोऱ्हाडे, पर्यवेक्षक सुधाकर वाबळे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सेवा, एकता, शिस्त आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ड्रोनद्वारे टिपण्यात आलेले भारताच्या नकाशाचे विहंगम दृश्य हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



