सध्य परिस्थितीत शेतीचा बचाव योग्य पद्धतीने करणे गरजेचे : डॉ. कौशिक

सध्य परिस्थितीत शेतीचा बचाव योग्य पद्धतीने करणे गरजेचे : डॉ. कौशिक
भारत सरकार, नवी दिल्ली अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने आणि महाराष्ट्र शासन कृषि विभाग आयोजित खेत बचाओ अभियान अंतर्गत सावंत वस्ती चिलेखनवाडी कार्यक्रम संपन्न
कृषि विज्ञान केंद्र , दहिगाव ने ची वाटचाल मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, अध्यक्ष, मा.आ. चंद्रशेखरजी घुले पाटील, उपाध्यक्ष तसेच विश्वस्त श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, भेंडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहे. भारत सरकार, नवी दिल्ली अंतर्गत देशभरात दिनांक २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान खेत बचाओ अभियान हि देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. जमिनीचे आरोग्य सुधारणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर वाढविणे, जल संधारण आणि नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याच संदर्भात सावंत वस्ती, चिलेखनवाडी ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथे तुर पिकाचे सद्य परिस्थितीत व्यवस्थापन प्रात्यक्षिक रुपात पार पडले.
यावेळी डॉ. एस. एस. कौशिक, प्रमुख व वरिष्ठ शास्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांनी सद्य परीस्थ्तीतीत तूर पिकामध्ये २५ पी.पी.एम. जी.ए. या संजीवकाची फवारणी फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत घेण्याचे सुचविले. त्याचप्रमाणे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून उपलब्ध पाण्यावर जेवढे क्षेत्रफळ मध्ये पिक घेणे शक्य आहे तेवढेच घ्यावे, शेतीमध्ये सेंद्रिय तसेच नैसर्गिक व रासायनिक खतांचा समतोल वापर, रासायनिक खतांची संतुलित मात्रा देऊन जमिनीचे आरोग्य कसे जपता येईल या विषयी मार्गदर्शन केले. तसेच एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन अंतर्गत ऊस पिकातील हुमणी किडीचे व्यवस्थापन, किड व्यवस्थापन करत असतांना कामगंध सापळा वापर, जैविक आणि वनस्पतीजन्य किटक नाशकाचा योग्य वापर करावा असे सुचविले. यावेळी तूर पिकामधील विविध किड व रोगांची ओळख कशी करून घ्यावी या विषयी डॉ. कौशिक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन केले तसेच तूर पिकात संजीवक जी. ए. २५ पी.पी.एम. ची फवारणी प्रात्यक्षिक सुद्धा घेण्यात आले. यावेळी कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातील श्री. नारायण निबे, विषय विशेषज्ञ कृषि विद्या यांनी खेत बचाओ अभियान काळात शेतकऱ्यांसाठी क्षेत्रीय पातळीवर राबविण्यात येणाऱ्या प्रक्षेत्र भेटी, प्रशिक्षणे, मेळावे यांचे आयोजन करत असतांना या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने, कृषी विभाग, आत्मा आणि राज्यातील कृषी विद्यापीठांच्या समन्वयाने सोबतच्या प्रमुख विषयांवर आधारित “शेतकरी जनजागृती मोहीम” राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. खेत बचाओ अभियान हे माती परीक्षणावर आधारित खते आणि इतर कृषी घटकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती करणे, तेलबिया, कडधान्ये आणि फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून पीक विविधीकरणाला (Crop Diversification) प्रोत्साहन देणे. पीक अवशेषांच्या व्यवस्थापनाला (Crop Residue Management) प्रोत्साहन देणे, प्रचार प्रसिद्धी द्वारे शेतकऱ्यांना पिकांचे अवशेष (पराटी/पेंढा इ.) जाळण्यापासून परावृत्त करणे. शेतकऱ्यांना सेंद्रिय/नैसर्गिक उत्पादनांच्या वापराबाबत प्रशिक्षित करणे.जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण आणि शेतावरील प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण आणि साठवणुकीबाबत जनजागृती करणे, शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणे हि उद्दिष्टे समोर ठेऊन राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक कृषि अधिकारी रविंद्र जगधने तर आभार गावचे सरपंच भाऊसाहेब सावंत सर यांनी मानले.


