जिल्हा परिषद शाळे लगतच्या पडलेल्या भिंतीचे काम त्वरित करावे:- माहिती अधिकारी संघटना तालुका सहसंघटक रोहित सोरटे यांचे प्रशासनास लेखी निवेदन
जिल्हा परिषद शाळे लगतच्या पडलेल्या भिंतीचे काम त्वरित करावे:- माहिती अधिकारी संघटना तालुका सहसंघटक रोहित सोरटे यांचे प्रशासनास लेखी निवेदन

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. २७/ करमाळा शहरातील श्री देवीचा माळ येथील दिनांक २३/०९/२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये तटभिंत पडण्याचा प्रकार घडला. तो अतिशय संताप जनक व विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्यापर्यंत येवून थांबला आहे. सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परिषद शाळा लगत श्री कमलाभवानी मंदिर आहे. त्याची तट भिंत शाळेला चिटकून आहे. या तटभिंतीचे बांधकाम बऱ्याच ठिकाणी पडण्याच्या स्थितीत आढळून आले आहे. त्यापैकीच एक बांधकाम शाळे लगत पडलेले आहे. त्याची गंभीरता ओळखून शालेय समितीने व मुख्याध्यापक यांनी २४/०४/२०२३ रोजी ट्रस्ट बरोबर यासंबंधी पत्रव्यवहार केला होता की आपण हे बांधकाम व तटभिंत एखाद्या बांधकाम व्यावसायिक यांना दाखवून ते दुरुस्त करून घ्यावे आपण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये व त्या लगतच्या ग्रामस्थांच्या जिवाशी आपण खेळू नये. त्या पत्रव्यवहारानंतर काही दिवसातच तटभित दोन वेळा कोसळली.
सदर प्रकार जिल्हा परिषद व ट्रस्ट याच्या मधिल जागेच्या वादातील असून, त्याचा परिणाम काल २३/०९/२०२५ रोजी भिंत पडल्या नंतर उघडकीस आला आहे. हा प्रकार अतिशय सूड बुद्धीने झालेला आहे असे निवेदनात रोहित सोरटे यांनी म्हटले आहे. परत त्यानंतर त्यांना दि. ०५/०६/२०२३ रोजी पत्रव्यवहार केला आहे की, आपण तटभिंतीचे काम करून घ्यावे पण त्यांनी लेखी स्वरुपात असे उत्तर पाठविले की आमचा आणि जिल्हा परिषद शाळेचा काही संबंध नाही. उलट हि शाळा बांधताना आम्हाला का विचारले नाही व हि शाळा आपण स्थलांतरीत करावी असे लेखी उत्तर दिले आहे. आम्ही हे काम करणार नाही असे स्पष्ट केले आहे. मग ट्रस्टची मगरूरी व मालकी हक्काची भाषा कोणाच्या राजकीय आशिर्वादाने चालले आहे. त्यांचा बुरखा फाडल्या शिवाय आम्ही श्री देवीचामाळ ग्रामस्थ स्वस्थ राहणार नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ कलम २१ नुसार विदयार्थी व बालकांचा शिक्षणाचा अधिकार ट्रस्टीचा बाप जरी आला तरी हिरावून घेऊ शकत नाही. याच निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य आठवले शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि जो हे दुध पेईल तो नक्कीच गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभलेल्या श्री देवीचामाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर जर कोण शिक्षणाला जाणूनबुजून आडकाठी व सूडबुद्धीने जिवावर बेतणारे संकटे जर ट्रस्ट आणत असेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून या ट्रस्टला बरखास्त व पायउतार केल्याशिवाय आता थांबणार नाही.
पुढे असा प्रश्न पडतो की यात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे चुकीचे आहेत की गटशिक्षण अधिकारी हे चुकीचे आहेत. यामध्ये बालकांचा व विध्यार्थ्याचा काय दोष आहे. याची लवकरात लवकर मुख्य कार्यकारी अधिकारी व गटशिक्षण अधिकारी त्याच प्रमाणे पदसिद्ध अध्यक्ष तहसिलदार यांनी लक्ष्य घालावे नाहीतर पुढील काळात विद्यार्थ्यांच्या जिवाला व शिक्षणाला धोका झाला तर आपल्या पैकी कोण जबाबदारी घेणार आहे हे आम्हाला आमच्या गावात श्री देवीचामाळ येथे ग्रामस्थासमोर सभा घेवून जाहिर करावे. नाही तर ट्रस्ट म्हणत आहे तसे जिल्हा परिषद शाळेवर बुलडोजर फिरवून जो पर्यंत हा प्रश्न सूटत नाही तो पर्यंत शाळा मंदिरात भरविण्यात यावी हि नम्र विंनती.
माहिती अधिकारी संघटना करमाळा तालुका सहसंघटक रोहित सोरटे यांनी सदर प्रकरणाची माहिती करमाळा तालुका नायब तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिलेली आहे व प्रशासनाने मुलांच्या जीविताचा धोका लक्षात घेता लवकरात लवकर सदर प्रकरणात जातीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती प्रशासनास केलेली आहे.



