पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथे ‘राखी फॉर नेशन’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित अनोखा उपक्रम
पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथे ‘राखी फॉर नेशन’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित अनोखा उपक्रम

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. ०८/ रक्षाबंधनचा धागा म्हणजे हा केवळ धागा नसून या धाग्यामध्ये बहिणीचे प्रेम माया जिव्हाळा लपलेली आहे खऱ्या अर्थाने हीच खरी बहिणीची माया आपल्या सैनिकांना ऊर्जा देणारी ठरणार आहे. आपल्या माय भूमीतील राखी सैनिकांचे मनोबल वाढवणारी आहे, अशी भावना माजी सैनिक श्री अशोक शिंदे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथे ‘राखी फॉर नेशन’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रम वेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय कोळेकर हे होते. यावेळी ते म्हणाले की मातृभूमीसाठी सदैव तत्पर असणारे सैनिक ऊन वारा पाऊस अशा कोणत्याही गोष्टीची परवा न करता देशासाठी आपले कर्तव्य डोळ्यात तेल घालून बजावत असतात. त्यांचा सन्मान करणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. यामध्ये रक्षाबंधन सारखे उत्सव म्हणजेच परिवारामधील नात्यांचा अनोखा संगम मानले तर वावगं ठरणार नाही.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयातर्फे जवानांप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याच्या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःहून तयार केलेल्या राख्या आज थेट सीमारेषेवरील वीर जवानांसाठी पाठवण्यात आल्या. या कार्यक्रमाला माजी सैनिक श्री अशोक शिंदे यांच्यासह पत्रकार श्री. राजेश गायकवाड, करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश मडके, तालुका सचिव श्री नरेंद्रसिंह ठाकूर, तालुका संघटक तुषार जाधव यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमावेळी पत्रकार बांधवांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांविषयी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी ही भावना म्हणजेच शिक्षणाचा खरा उद्देश आहे. ‘राखी फॉर नेशन’ सारखे उपक्रम केवळ सामाजिक जाणीव नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची प्रेरणा जागवणारे असतात. त्यांनी शाळेच्या पुढाकाराचे व कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करत असे उपक्रम ग्रामीण भागात घडत असल्यानेच शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थाने बदल घडतो, असे गौरवोद्गार काढले. यावेळी शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते जमा केलेल्या राख्या सीमेवरील जवानांसाठी कृतज्ञतेच्या आणि प्रेमाच्या संदेशासह सुपूर्द करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब सरडे, किरण परदेशी, हनुमंत रासकर, प्रताप बरडे, विलास पाटील, विशाल राठोड, रमेश मोरे, सुहास कानगुडे, सुरेश बरडे, दादा कांबळे आदींनी परिश्रम घेतले.



