गोरक्षनाथ गडावरून पायी दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

गोरक्षनाथ गडावरून पायी दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान
प्रतिनिधी: महेश कांबळे
अहिल्यानगर: दि. २६/ अहिल्यानगर जवळील गोरक्षनाथ गडावरून सालाबादप्रमाणे दिनांक २५ जून रोजी श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड ते पंढरपूर आषाडी दिंडी सोहळा प्रस्थान करण्यात आले असून दिंडीचे हे ४० वे वर्ष आहे अशी माहिती ओम चैतन्य गोरक्षनाथ दिंडी सोहळा ट्रस्ट चे सचिव राधाकिसन गांधले यांनी दिली आहे.
वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज कदम यांनी प्रारंभ केलेली व राम महाराज पोते, वै. गोरक्षनाथ महाराज ढोकणे, भाऊसाहेब महाराज हरिचंद्रे व दिंडी सोहळा ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भगिरी डोंगर रांगेतील अहिल्यानगर जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ गड येथून २५ जून रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिंडी सोहळ्यात दररोज पहाटे श्री पूजा व अभिषेक, आरती व दर्शन दुपारी प्रवचन व रात्री कीर्तन नंतर दिंडी प्रवासात अखंड भजन होणार आहे दिंडी सोहळाचा पंढरपूर येथील मुक्काम श्री चैतन्य गोरक्षनाथ मंदिर, पंढरपूर टेंभुर्णी नाका, शिंदे नाईक मळा, पंढरपूर येथे राहणार आहे. दिंडी सोहळा गोरक्षनाथ गडावरून निघाल्यावर पहिला मुक्काम पिंपळगाव माळवी येथे राहणार असून दुसरा मुक्काम २६ जून ला नगर मधील सावेडीतील सहकारनगर मध्ये राहणार असून तेथील व्यवस्था माऊली कृपा मित्र मंडळ, यांनी केली आहे दि. २७ जून ला दिंडी सोहळा समतानगर येथे डॉ. प्रकाश जाधव यांचे येथे सकाळचा नाश्ता घेणार असून रात्रीचा मुक्काम नगर तालुक्यातील दहिगाव येथे राहणार आहे. दिनांक ३० जून रोजी चापडगाव येथे घोड्याचे रिंगण होणार आहे. पुढे करमाळा मार्गे पंढरपूरला हा सोहळा पोचणार आहे. द्वादशीला काल्याचा प्रसाद झाल्यानंतर दिंडी सोहळा विसर्जित होणार आहे.