आमदारांचे खुनशी राजकारण शेतकऱ्यांच्या मुळावर; दहिगाव पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया:- भरत अवताडे

आमदारांचे खुनशी राजकारण शेतकऱ्यांच्या मुळावर; दहिगाव पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया:- भरत अवताडे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १८/ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूकींचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच तालुक्यामध्ये विकासाला खीळ घालण्याचे खुनशी राजकारण सुरू झाले आहे. याचा प्रत्यय नुकताच फिसरे, शेलगाव (क) व सौंदे या गावातील शेतकऱ्यांना आला. उजनी धरण ते कोळगाव धरण या दरम्यान भूमिगत बोगद्यावरती अनेक शेतकऱ्यांनी कुपनलिका घेऊन त्यावरती खाजगी डीपी बसवलेले आहेत. सदर डीपी एक वर्षापासून चालू आहेत. सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे असे असताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता १६ फेब्रुवारी रोजी डीपींचे कनेक्शन कट करण्यात आले. हे नेमके कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले यावरून सध्या गावागावात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाईप जाळल्यामुळे दहिगाव पट्ट्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या भवितव्याविषयी शंका वाटू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याच भागातून जाणाऱ्या बोगद्यावरती स्वतः बोर घेणे, डीपी बसविणे, पाच ते दहा हजार फूट लांबीच्या पाईपलाईन करणे यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून पिकांची लागवड केलेली आहे, असे असताना राजकीय आकस भावनेतून डीपी कट करण्याच्या सूचना विज मंडळाला दिल्या आहेत.
शेलगाव (क), फिसरे, सौंदे या गावातील अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आलेले आहे. विधानसभा २०२४ ची निवडणूक, आदिनाथ सहकारी साखर कारखाना व जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक या निवडणुकांमध्ये या भागातून आपल्या विरोधात मताधिक्य जात असल्यामुळे त्याचा रोष मनात ठेवून हे पाऊल उचलले जात असल्याच्या चर्चा आता पारापारावर रंगू लागल्या आहेत. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सरपडोह, वरकटणे, जेऊर, दहिगाव या भागातून हा बोगदा येतो. या बोगद्यावरती अनेक डीपी बसविलेले आहेत, परंतु ते मात्र सुरू आहेत. सदर गावे आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीला सदर गावांमधून निवडून आलेले प्रतिनिधी हे आपल्या गटाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्यावरती मेहरबानी दाखवलेली आहे काय हा प्रश्नही आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करणार:- भरतभाऊ अवताडे (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, तथा नूतन पंचायत समिती सदस्य करमाळा).
मी निवडून आलेल्या हिसरे गणातील अनेक शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. याविषयी मी वरिष्ठांशी बोललेलो आहे. वीज पुरवठा लवकरच आपण सुरळीत करू असे त्यांनी मला आश्वासन दिलेले होते. तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत केलेला नाही. येत्या दोन दिवसात जर हे डीपी पूर्ववत जोडले नाहीत तर आपण या भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा भरतभाऊ अवताडे यांनी दिला आहे.



