अहिल्यानगर येथील माळीवाड्यातून वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान

अहिल्यानगर येथील माळीवाड्यातून वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान
प्रतिनिधी: महेश कांबळे
अहिल्यानगर: दि. २६/ अहिल्यानगर येथील वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे पायी दिंडी सोहळा पंढरपूर आषाडी दिंडीचे प्रस्थान झाले. दिंडीचे हे १४ वे वर्ष आहे. ब्रम्हलीन समर्थ सद्गुरु हरिहर महाराज, ब्रम्हलीन शंकर महाराज जोशी, ब्रम्हत्तीन गोपाल चैतन्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या वतीने ही दिंडी काढण्यात येते.
कपिलेश्वर महादेव मंदिर, माळीवाडा येथे प्रथम पादुका पूजन व अभिषेक ज्ञानेश्वर व समृद्धी मोकाटे या दांपत्याची हस्ते करण्यात आली. नंतर रथ पूजन मोहन व लता मेहेत्रे या दांपत्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौदर, सुनील त्रिपाठी, ईश्वरसिंग परदेशी, भगवान मोकाटे, विनायक खेडकर, सुनील दातरंगे, राजेंद्र फुलारी, गणेश सुडके, अनंत द्रविड आदींसह मोठया संख्नेने भाविक व दिंडीत सहभागी होणारे वारकरी उपस्थित होते.
दिंडीमध्ये बाल वारकरी पथक, पांडुरंग, रुक्मिणीची वेशभूषा केलेले बालके, एकसारख्या साड्या परिधान केलेल्या महिला, झेंडे, पताका होत्या. मंदिरातून दिंडी पुढे सीताबनं लॉन येथे मुक्कामी राहिली. दिंडी सोहळा नगरहून निघाल्यावर पहिला मुक्काम दहिगाव येथे राहणार आहे व पुढे करमाळा मार्गे पंढरपूरला हा सोहळा ४ जुलैला पोहचणार आहे.