Breaking
ब्रेकिंग

करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौकात भला मोठा खड्डा; अपघाताचा धोका वाढला

0 7 6 9 4 3

करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौकात भला मोठा खड्डा; अपघाताचा धोका वाढला

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०८/ करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौक येथे रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेने व संबंधित लोकप्रतिनिधींनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामामुळेच हा खड्डा निर्माण झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या चौकातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून, दुचाकीस्वार, चारचाकी वाहने, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना या खड्ड्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसात हा खड्डा नजरेस न पडल्याने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही दिवसांतच रस्ता उखडून खड्डा पडणे हे केलेल्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते व ‘शब्द सैनिक’चे प्रतिनिधी गोपाळ पांडुरंग वाघमारे म्हणाले की, “पंजाब वस्ताद चौकातील हा खड्डा म्हणजे केवळ अपघाताला निमंत्रण नाही, तर नगरपालिकेच्या आणि संबंधित लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा आहे. निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेचा जीव धोक्यात घालण्याचा हा प्रकार आहे. दुर्दैवाने, एखादी जीवघेणी घटना घडल्याशिवाय प्रशासन हालचाल करत नाही, ही शोकांतिका आहे. कोणताही अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर राहील. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हा खड्डा बुजवावा, अन्यथा जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. दरम्यान, नागरिकांकडून या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करून दर्जेदार काम करावे, तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासन वेळेत पावले उचलणार की एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार, याकडे संपूर्ण करमाळा शहराचे लक्ष लागले आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे