दत्तकला शिक्षण संस्था येथे महिला सुरक्षितता व कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक (POSH) कायद्याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

दत्तकला शिक्षण संस्था येथे महिला सुरक्षितता व कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक (POSH) कायद्याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २५/ दत्तकला शिक्षण संस्था येथे महिला सुरक्षितता व कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक (POSH) कायद्याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ॲडव्होकेट स्नेहा विजय भापकर व ऍडव्होकेट कल्पना श्रीकांत साळुंके यांनी विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांना पॉश कायद्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी महिलांचे हक्क, कार्यस्थळी सुरक्षिततेचे महत्त्व, लैंगिक छळाच्या घटनांविरोधात उपलब्ध कायदेशीर संरक्षण तसेच तक्रार निवारण प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवून आपल्या अधिकारांची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी “कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा २०१३ (POSH Act)” अंतर्गत प्रत्येक संस्थेमध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) असणे बंधनकारक असून महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि सकारात्मक वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले. दत्तकला शिक्षण संस्थेच्या ICC अंतर्गत तक्रार समिती च्या द्वारे केल्या जाणाऱ्या कामाचे ऍडव्होकेट स्नेहा भापकर यांनी कौतुक केले.
संस्थेमध्ये सध्या जवळपास ३२०० मुली शिक्षण घेत असून २७२ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे कॅम्पस मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांनी सांगितले. ते म्हणाले की, दत्तकला शिक्षण संस्था नेहमीच महिला सुरक्षिततेला प्राधान्य देते आणि विद्यार्थिनींसाठी सुरक्षित व सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
या कार्यक्रमास संस्थेतील सर्व प्राचार्य, शिक्षक, महिला कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.


