गुंडेगाव परिसरात गावरान कांदा लागवडीला वेग; जिरायती माळरानावर सिंचनाची किमया
गुंडेगाव परिसरात गावरान कांदा लागवडीला वेग; जिरायती माळरानावर सिंचनाची किमया
गुंडेगाव (ता.अहिल्यानगर)/ संजय भापकर
पूर्वी ज्वारी, करडई, हुलगा अशी कडधान्य जिरायती पिके हीच ओळख असलेल्या अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव परिसराने आता ‘ *कांद्याचे आगार* ’ म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे. डिसेंबर महिन्यातील पोषक वातावरणामुळे सध्या गावरान कांदा लागवडीला मोठा वेग आला असून शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त या नगदी पिकावर केंद्रित झाली आहे.
मागिल काही वर्षांत डोंगराच्या पायथ्या पासून माथ्यावरपर्यत राबविण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांमुळे मोठ्या प्रमाणावर जिरायती जमीन सिंचनाखाली आली आहे. चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नाले, ओढे, तलाव तुडुंब भरून वाहत असून याचा थेट फायदा रब्बी हंगामातील कांदा लागवडीला होत आहे. पूर्वी माळरान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगर पायथ्यावरील जमिनी शेतकऱ्यांनी कष्ट, मेहनत आणि नियोजनाच्या जोरावर ओलिताखाली आणल्या आहेत.
लाल कांदा काढल्यानंतर तात्काळ विकावा लागतो, तर गावरान कांदा वखारीत साठवणुकीस योग्य असल्याने बाजारभावाचा अंदाज घेऊन विक्री करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा कल गावरान कांद्याकडे वाढला आहे. खर्च तुलनेने कमी, टिकाऊपणा अधिक आणि योग्य भाव मिळण्याची शक्यता यामुळे गावरान कांदा शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरत आहे.
गुंडेगाव परिसरातील डोंगर पायथ्याचा सुमारे ७२८ हेक्टर जिरायती व पर्जन्यछायेचा पट्टा असूनही या भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड सुरू आहे. ज्वारी, करडई व कडधान्य पिकांची जागा आता नगदी पीक असलेल्या कांद्याने घेतली आहे. मध्यंतरी नैसर्गिक आपत्तीमुळे लाल व रांगडा कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, सध्या बाजारभावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
कांदा उत्पादनात अग्रेसर असून त्याचबरोबर तुकाईमळा, हराळमळा, शुढळेश्वर मंदिर परिसर, धावडेवाडी ,चौधर वाडी,कुताळमळा, मानमोडी, ससे टेकडी, कोरगाव रोड या जिरायती पट्ट्यां मध्येही गावरान कांद्याची लागवड जोमात सुरू आहे. सर्वत्र हिरवीगार शेतं आणि कांद्याच्या पिकांनी माळरानाचे चित्रच पालटले आहे.
> “ *गावरान कांदा लागवडीचा खर्च इतर कांद्याच्या तुलनेत कमी असून उत्पादन चांगले मिळते. लाल कांदा साठवणुकीस अयोग्य असल्याने अनेकदा तोटा सहन करावा लागतो. गावरान कांद्यास अनुकूल वातावरण व योग्य बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो.
संतोष भापकर ( अध्यक्ष संपूर्ण शेतकरी सामुहिक शेती गट, गुंडेगाव)
> “ *दोन एकर क्षेत्रावर गावरान कांद्याची लागवड सुरू असून एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. लाल कांद्याच्या तुलनेत गावरान कांद्याचे उत्पादन अधिक स्थिर आहे. गावातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सध्या कांदा पिकावरच अवलंबून आहे,* ”
रामदास हराळ ( प्रगतशील कांदा उत्पादक शेतकरी, गुंडेगाव)
“ *गुंडेगाव परिसरात गावरान कांद्याचे क्षेत्र वाढल्याने बियाणे, खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, फवारणी औषधे व ठिबक साहित्याची मागणी लक्षणीय वाढली आहे. विशेषतः स्थानिक वाणाच्या बियाण्याला मोठी मागणी असून शेतकरी आता नियोजनबद्ध शेतीकडे वळत आहेत. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकरी गुंतवणूक करण्यासही पुढे येत आहे.गावरान कांद्याला तुलनेने कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्याने आगामी काळात कांद्याचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.*
सुनील भापकर ( कृषी बियाणे औषधे दुकानदार, गुंडेगाव)
एकूणच जलसंधारण, शेतकऱ्यांची मेहनत आणि बाजाराभिमुख शेती यामुळे गुंडेगाव परिसरातील जिरायती शेतीला नवे बळ मिळाले असून ‘कांदा’ हेच येथील समृद्धीचे नवे प्रतीक ठरत आहे.



