रस्त्यांवर खड्ड्यांची सत्ता ; गावांमध्ये विकासाच्या गप्पा
गुंडेगाव ते देऊळगाव रोडवर खड्यांचे साम्राज्य..

रस्त्यांवर खड्ड्यांची सत्ता ; गावांमध्ये विकासाच्या गप्पा
गुंडेगाव ते देऊळगाव रोडवर खड्यांचे साम्राज्य..
वाळकी / विशेष प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. सत्ताधारी आणि इच्छुकांनी बऱ्याच विकासकामांचे उद्घाटन केले असून पुन्हा एकदा घोषणांची चढाओढ सुरू होणार आहे. गावामध्ये विकासाच्या गप्पा सुरू असली तरी गुंडेगाव देऊळगाव रस्त्यांवर मात्र खड्यांचीच सत्ता आहे,अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
या गाजावाजाच्या पार्श्वभूमीवर खरा प्रश्न उभा राहतो तो गुंडेगाव देऊळगाव तसेच भागातील रस्त्यांचे काय होणार? गावांचे रस्ते अजूनही खड्डयांतच आहेत. वाहतूक करताना नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यातच अपघातांच्या घटना सुरूच आहेत. विकासाच्या गप्पा होत असताना प्रत्यक्षात खड्ड्यांची समस्या जनतेला भोगावी लागत आहे.कामे सुरू नसल्याचे कारण प्रशासन तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून जबाबदारी उडवत आहे. मात्र मतदारांच्या डोळ्यांमधील प्रश्न वाढतच आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत सुरू केलेली अनेक कामे विविध कारणांमुळे रखडली आहेत. तर कुठे कामे सुरू आहेत, त्यांतही पावसाळ्यात नव्या कामांना सुरुवात होण्याची शक्यता कमी आहे. अनेक विकासाच्या गप्पा होत असताना प्रत्यक्षात खड्यांची समस्या जनतेला भोगावी लागत आहे.गावांतील रस्त्यांची रखडलेली कामे आरोग्य सुविधांचा अभाव आणि खंडित वीजपुरवठा या समस्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षातील इच्छुक उमेदवारांना आता फक्त राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा दाखला देऊन मतदारांचे मन जिंकायचे आहे हा त्यांच्याकडे दुर्मीळ पर्याय आहे.ग्रामीण भागातील अनेक गावांच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणीच बोलत नाही. त्यामुळे गुंडेगाव भागातील अनेक रस्त्यांची वाट अडकली आहे. पावसाळ्यात या रस्त्यांमुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे,असे चित्र सध्यातरी पहायला मिळत आहे.



