Breaking
ब्रेकिंग

महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

0 8 6 5 2 1

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

*शेती शाश्वत करण्यासाठी आंबा महत्त्वाचे फळपीक*

*- कुलगुरू डॉ. विलास खर्चे*

राहुरी तालुका जावेद शेख

महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत फळ प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणे घेण्यात येतात. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय निर्माण करून उद्योजक होणार्या लोकांच्या यशोगाथा तयार करायला हव्यात. आपला देश शेतीप्रधान देश आहे. आपला महाराष्ट्र उद्यानविद्येमध्ये अग्रेसर असून आपली शेती शाश्वत करण्यासाठी शेतीला फळप्रक्रियेची जोड देणे आवश्यक आहे. या दृष्टीने शेती शाश्वत करण्यासाठी आंबा फळपीक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागांतर्गत पाच दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम कड व प्रक्रिया अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाले की सध्या प्रक्रिया उद्योगाला मोठे महत्त्व आले आहे. भविष्यात उद्योजक बनण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणामध्ये शिकवण्यात येणार्या सर्व विषयांचे ज्ञान आत्मसात करा. या प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या ज्ञानाने इतर लोकांना प्रोत्साहित करा त्यामुळे भविष्यात आंबा पिकामध्ये चांगले उद्योजक निर्माण होतील असे यावेळी ते म्हणाले. डॉ. साताप्पा खरबडे मार्गदर्शन करताना म्हणाले की फळ प्रक्रिया प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकर्यांना फळ प्रक्रिया उद्योग एक उत्तम शेतीपुरक व्यवसाय ठरू शकतो. हे 5 दिवसीय प्रशिक्षण निश्चितच शेतीपूरक व्यवसायासाठी महत्त्वाचे ठरेल असे यावेळी ते म्हणाले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती ज्यामध्ये आंबा गर साठवणे, कैरी लोणचे व पन्हे, आंबा सरबत, सिरप, स्क्वॅश, आंबा पावडर, आमचूर, जॅम तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्न सुरक्षितता व मानके कायद्याची माहिती, प्रक्रिया उद्योगाची नोंदणी, उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल, पदार्थांचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग, प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या कर्ज योजना, अनुदान यासंबंधीची माहिती दिली जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विक्रम कड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल घुगे यांनी तर आभार श्री.गोरक्षनाथ चौधरी यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी व प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले 22 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे