गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पद्मशाली सोशल फाउंडेशनचा आधार; १५० विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने एकत्र येणे हीच खरी सामाजिक जबाबदारी – इंजि. प्रशांत कोक्कुळ
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पद्मशाली सोशल फाउंडेशनचा आधार; १५० विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने एकत्र येणे हीच खरी सामाजिक जबाबदारी – इंजि. प्रशांत कोक्कुळ
अहिल्यानगर : सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने श्री मार्कंडेय शैक्षणिक संकुल येथे शहरातील विविध शाळांमधील १५० विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्या या उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष असून गेल्या दशकभरात तब्बल १,५०० विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करून शिक्षणासाठी मोलाची मदत करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंजि. प्रशांत कोक्कुळ, इंजि. अक्षय बल्लाळ, अमित सुंकी आणि गणेश अवधूत, पत्रकार बाबासाहेब तिपुळे राजू कोडम उपस्थित होते. तसेच पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी, सचिव अजयकुमार लयचेट्टी, उपाध्यक्ष श्रीनिवास बुरगुल, राजेंद्र बुलबुले, वरद लकशेट्टी, ओंकार आडेप, ओंकार जेटला यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.
प्रमुख पाहुणे इंजि. प्रशांत कोक्कुळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या हातात शालेय दप्तर देणे म्हणजे केवळ शैक्षणिक साहित्याचे वाटप नव्हे, तर त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करण्याचे काम आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे. पद्मशाली सोशल फाउंडेशनने गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने राबविलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.” शिक्षण हीच समाज परिवर्तनाची सर्वात मोठी ताकद आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी प्रोत्साहन आणि आवश्यक साहित्य उपलब्ध झाले, तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते मोठी स्वप्ने पाहण्यास सक्षम होतात. समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या पद्मशाली सोशल फाउंडेशनचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून अशा विधायक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास मोठी मदत होत आहे.
प्रास्ताविकात बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी म्हणाले, “पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्ट गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने दप्तर वाटपाचा उपक्रम राबवत आहे. या दहा वर्षांत १,५०० विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले असून यावर्षी शहरातील विविध शाळांमधील १५० गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप, श्रावण महिन्यात महाप्रसाद भंडारा, गरजू रुग्णांना आर्थिक मदत, आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना सहकार्य तसेच विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठीही फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील असते. भविष्यातही समाजातील गरजू घटकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील.
यावेळी ट्रस्टचे सचिव अजयकुमार लयचेट्टी यांनी सांगितले की, पद्मशाली सोशल फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून यावर्षी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. यामध्ये श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक विद्यालय, दादा चौधरी मराठी शाळा, महात्मा फुले विद्यामंदिर, दादा चौधरी विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उक्कडगाव), प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कै. वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळा, बालक मंदिर महिला मंडळ, सिताराम सारडा माध्यमिक विद्यालय, मनोहरलाल रामचंद्र सबलोक प्राथमिक विद्यालय, शारदा विद्यामंदिर, १०८ श्री महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक विद्यालय, श्रीमती पार्वतीबाई डहाणूरकर कन्या विद्यालय आणि महर्षी ग. ज. चितांबर विद्यामंदिर या शाळांमधील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास बुरगुल यांनी केले, तर अमित सुंकी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



