Breaking
ब्रेकिंग

शाश्वत शेतीसाठी जमिनीचे योग्य व्यवस्थापन गरजेचे* *- कुलगुरू डॉ. विलास खर्चे*

0 8 6 5 1 0

*शाश्वत शेतीसाठी जमिनीचे योग्य व्यवस्थापन गरजेचे*
*- कुलगुरू डॉ. विलास खर्चे*

राहुरी तालुका जावेद शेख

हरितक्रांतीमुळे पिकांच्या उत्पादकतेत मोठी वाढ झाली पण जमिनीच्या व्यवस्थापनात आपण कमी पडलो. जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले. ज्या प्रमाणात उत्पादन घेतले त्या प्रमाणात जमिनीला आवश्यक असणारे सेंद्रिय पदार्थ व पोषकतत्वे दिली नाहीत परिणामी जमिनीची प्रत खालावली. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.6% पेक्षा खाली आले. जमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी शेतातील पिकांचे अवशेष न जाळता त्यापासून सेंद्रिय खतांची निर्मिती करून त्याच्या वापराने जमिनीचे संवर्धन करावे लागेल. शाश्वत शेतीसाठी जमिनीचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयातील मृदाशास्त्र विभागामध्ये पाच दिवसीय माती व पाण्याची चाचणीमधील विश्लेषणात्मक तंत्रे या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, प्रशिक्षण कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ. रितु ठाकरे व डॉ. श्रीगणेश शेळके उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की लोकसंख्या वाढत असून नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे शेतीसाठी जमीन कमी होत आहे. या परिस्थितीत आहे त्या जमिनीची प्रत सुधारण्याबरोबरच पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी माती व पाणी परीक्षण करून खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या प्रशिक्षणामधून परीक्षार्थींनी पुरेपूर ज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग शेतकर्यांसाठी करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या भाषणात म्हणाले की जमिनीचे आरोग्य फार महत्त्वाचे असून पिकांची वाढ ही पूर्णपणे जमिनीवर अवलंबून असते. जमीन सुपीक असेल तर पिकांची उत्पादन क्षमता चांगली असते. प्रशिक्षणार्थ्यांनी माती, पाणी तपासणीतील सर्व बारकावे शिकून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थींना केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. भीमराव कांबळे म्हणाले की मातीचे चाचणी करून करून शिफारस देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणासाठी दहा जिल्ह्यातून विद्यापीठातील मृदाशास्त्र विषयातील अधिकारी, खाजगी माती तपासणी प्रयोगशाळेतील कर्मचारी, प्रगतशील शेतकरी व विद्यार्थी असे 27 प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रितू ठाकरे यांनी तर आभार डॉ. श्रीगणेश शेळके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. सचिन सदाफळ, मृदाशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे