फ्लॅट खरेदी फसवणूक प्रकरणातील संबंधितांवर न्यायालयाच्या आदेशाने करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
फ्लॅट खरेदी फसवणूक प्रकरणातील संबंधितांवर न्यायालयाच्या आदेशाने करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १९/ करमाळा येथील सुशिक्षीत सिव्हिल इंजिनियर हर्षद हरिश्चंद्र गाढवे याची फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व त्याची पत्नी तसेच नामवंत इंजिनियर, बारामती बँकेचे शाखाधिकारी व करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि बांधकाम व्यवसायीक यांचेवर करमाळा न्यायालयाच्या आदेशाने करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमाळा येथील सिव्हिल इंजिनियर हर्षद हरिश्चंद्र गाढवे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी माऊली बिल्डकॉनच्या प्रोजेक्ट मधील फ्लॅट खरेदी घेण्यासाठी बारामती सहकारी बँके कडून कर्ज काढून व्यवहार पूर्ण केला. परंतु सदर फ्लॅट मधील सुमारे 40 टक्के काम अर्धवट असताना त्याची खातरजमा न करता बारामती सहकारी बँकेचे शाखाधिकारी यांचेशी संगनमत करून कर्जाची संपूर्ण रक्कम माऊली बिल्डकॉनचे भागीदार यांनी सदर भागीदारी संस्थेमध्ये जमा करून घेतली. त्याचप्रमाणे सदर प्रोजेक्ट शेजारील ओपन स्पेस (सुविधा भूखंड) त्याच प्रोजेक्ट मध्ये असल्याचे भासवून आधी विकसित करून नंतर पुन्हा जमीनदोस्त व नष्ट करून फिर्यादी, शासनाचे सक्षम अधिकारी तसेच तेथील रहिवाशी यांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे फिर्यादी व रहिवासी यांची असुविधा व नुकसान केले. तसेच पूर्णत्व प्रमाणपत्र न मिळवता बनावट भोगवटा प्रमाणपत्रासह बोगस व खोटे दस्तऐवज तयार केले. तसेच इतर अनेक बाबतीत महारेरा, GST, Income Tax आस्थापना यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला. त्यामुळे माऊली बिल्डकॉनचे भागीदार इंजिनीयर सुरेश लक्ष्मण घाडगे–पाटील, सुवर्णा प्रविण जाधव, दिनेश घोलप तसेच बारामती सहकारी बँकेचे शाखाधिकारी काकासाहेब कचरू कोरडे आणि प्रविण प्रदिप जाधव यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या फिर्यादची व गंभीर आरोपांची दखल घेत करमाळा येथील फौजदारी न्यायालयाने दिनांक ८/९/२०२५ रोजी करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
सदर आदेशानुसार करमाळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक, माजी बांधकाम सभापती आणि बांधकाम व्यावसायिक प्रवीण प्रदीप जाधव व त्यांची पत्नी सुवर्णा जाधव तसेच नामवंत इंजिनीयर सुरेश लक्ष्मण घाडगे पाटील, दि बारामती सहकारी बँक करमाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक काकासाहेब कचरु कोरडे, तसेच करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक दिनेश देविदास घोलप यांच्या विरोधात करमाळा पोलिस ठाण्यात दिनांक १२/९/२०२५ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३१८, ३१६, ३३७, ३३८, ३३६, १९८, ३१४, ३३५, ३३९, ३४०, ३४४ सह कलम ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार आता करमाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
फिर्यादी हर्षद हरिश्चंद्र गाढवे यांच्या वतीने ॲड. जयदिप ज्ञानदेव देवकर यांनी न्यायालयात कामकाज पाहिले.
या गुन्ह्यातील तीन आरोपी जाधव, घोलप, कोरडे यांचेवर सुमारे 3 कोटींच्या फसवणुकी बाबत दि. 4/7/2025 रोजी गु.र.नं. 539/2025 गुन्हा दाखल असून त्यामध्ये हीच 12 कलमे लागून सुमारे 3 महिने कालावधी होऊन व आत्मदहनाचा इशारा होऊन देखिल राजकीय वरदहस्त मुळे आरोपी शहरात मोकाट व राजरोस फिरत आहेत. तरी आपणास लवकरात लवकर न्याय मिळावा अशी तळमळीची विनंती फिर्यादीने प्रशासनास केली आहे



