कोरडवाहू शेतीत एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करून शेतकर्यांचे जीवनमान उंचवावे — कुलगुरू डॉ. शरद गडाख*
*कोरडवाहू शेतीत एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करून शेतकर्यांचे जीवनमान उंचवावे — कुलगुरू डॉ. शरद गडाख*
राहुरी तालुका जावेद शेख
सोलापूर येथील विभागीय संशोधन केंद्राने कोरडवाहू भागातील शेतकर्यांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या 200 पेक्षा अधिक शिफारशी प्रसारित केलेल्या आहेत. ब्रिटिश काळामध्ये स्थापन झालेल्या या संशोधन केंद्राने आपल्या कार्यातून नावलौकिकात भर घातली आहे. कोरडवाहू शेतीच्या उन्नतीसाठी या केंद्राने मृद व जलसंधारण, शेततळे, पीक पद्धती, विविध वाण, कोरडवाहू फळझाडे लागवड तंत्रज्ञान, आंतरपीक पद्धती तसेच कृषी यांत्रिकीकरण याविषयीचे तंत्रज्ञान शेतकर्यांच्या शेतावर पोहोचविण्याचे भरीव काम केले आहे. याचबरोबर कोरडवाहू शेतीमध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करून शेतकर्यांचे जीवनमान उंचवावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
सोलापूर येथील विभागीय संशोधन केंद्राला कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सदिच्छा भेट दिल्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विभागीय संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी संशोधन संचालक डॉ. नितीनकुमार रणशूर आणि इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते.
यावेळी डॉ. शरद गडाख मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की हे संशोधन केंद्र शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून तसेच शिवार फेरी, प्रक्षेत्र भेट इत्यादींच्या आयोजनातून विद्यापीठाचे सुधारित तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. यावेळी डॉ. शरद गडाख यांनी मुळेगाव प्रक्षेत्रावर चालणार्या विविध प्रयोगांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. नितीनकुमार रणशूर यांनी विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या कार्याचा आढावा यावेळी सादर केला. डॉ. नितीनकुमार रणशूर यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे विमोचन यावेळी डॉ. शरद गडाख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.



