आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात संपन्न
आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
पुणे: दि. २६/ दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे भारतीय लोकशाहीचा उत्सव असणारा ‘२६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिन’ अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाप्रती आदर आणि जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रा. डॉ. विलास उगले उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. शंकर घाडगे यांनी आपले विचार मांडले. तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अपर्णा आगाशे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. कुमरे के. एल. प्रा. दिलीप सोनकांबळे, प्रा. दांडेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी उपस्थितांनी महामानवास अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अपर्णा आगाशे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी २६ नोव्हेंबर या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, “भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून, ते आपल्याला केवळ हक्कच देत नाही, तर आपली कर्तव्ये देखील अधोरेखित करते. विद्यार्थ्यांमध्ये संविधानात्मक नैतिकता रुजवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे.” त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
यानंतर कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्देशिकेचे (Preamble) सामूहिक वाचन. सभागृहातील सर्व मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उभे राहून संविधानाच्या सरनाम्याचे वाचन केले. “आम्ही भारताचे लोक…” या शब्दांनी वातावरण भारावून गेले आणि लोकशाही मुल्यांचा पुनरुच्चार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. शंकर घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संविधानाचे विविध पैलू उलगडून दाखवले. त्यांनी संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार स्तंभांचे महत्त्व सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ते म्हणाले की, “संविधान हा केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ती भारतीयांची जीवनपद्धती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्टाने आणि दूरदृष्टीने देशाला हे संविधान दिले आहे, त्याचे जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रा. डॉ. विलास उगले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “देशाचे जबाबदार नागरिक घडवण्यासाठी महाविद्यालयात असे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरता संविधानाचा अभ्यास न करता, त्यातील तत्वे आपल्या दैनंदिन आचरणात आणली पाहिजेत. संविधानामुळेच आज आपण सर्वजण एकाच छत्राखाली सुरक्षित आणि सन्मानाने जगत आहोत.”प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे वाचन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन प्रा. कुमरे के. एल. यांनी केले. त्यांनी आपल्या निवेदनातून संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. ईश्वरी मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी उपस्थित पाहुणे, प्राचार्य, आयोजक समिती आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.



