Breaking
ब्रेकिंग

कृषी मूल्य साखळी बळकटीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात सामंजस्य करार

0 7 6 9 4 7

कृषी मूल्य साखळी बळकटीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात सामंजस्य करार

राहुरी तालुका जावेद शेख

शैक्षणिक संशोधन आणि खाजगी कृषी उद्योग यांतील दरी कमी करून मूल्य साखळी बळकटीच्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. हा करार नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स मुख्यालयात कुलगुरू डॉ. विलास कर्चे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सामंजस्य करारावर कृषी विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी तर सह्याद्री फार्म्सच्या वतीने सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. विलास शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करताना म्हणाले, “या सामंजस्य करारांतर्गत संयुक्त संशोधन, विस्तार सेवा व प्रगत प्रशिक्षण उपक्रम राबवून संपूर्ण कृषी मूल्य साखळी बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन कौशल्याचा आणि सह्याद्री फार्म्सच्या व्यापक शेतकरी जाळ्याचा लाभ घेत, शेतकऱ्यांसाठी परिणामकारक व प्रत्यक्ष उपयोगी नवकल्पना विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.”
या करारामुळे कृषीच्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता, प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव मिळणार आहे. विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सह्याद्री फार्म्सच्या अत्याधुनिक प्रक्रिया केंद्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. यामुळे त्यांना काढणीपश्चात तंत्रज्ञान, निर्यात दर्जाचे व्यवस्थापन आणि पुरवठा साखळीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेल.ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचा कृषी उद्योग सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी सह्याद्री फार्म्स आणि विद्यापीठाच्या ‘इन्क्युबेशन सेंटर’च्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन दिले जाईल. यामुळे नोकरी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारे नवे ‘कृषी उद्योजक’ घडण्यास मोठी मदत होईल.शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने हा करार एक मैलाचा दगड ठरणार आहे. विद्यापीठाच्या संशोधनातून विकसित झालेले प्रगत तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचेल. या तंत्रज्ञानाच्या साथीने पिकवलेल्या दर्जेदार शेतमालाला सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून थेट जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेशी जोडले जाईल.
काढणीपश्चात होणारे नुकसान कमी करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. शेतमालावर प्रक्रिया करून तो विकल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला जास्तीत जास्त व रास्त भाव मिळून त्यांच्या उत्पन्नात शाश्वत आणि भरीव वाढ होईल. याप्रसंगी राहुरी विद्यापीठाचे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, निफाड येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. भालचंद्र मस्के, सह्याद्री फार्म्सचे संचालक श्री. मंगेश भास्कर, श्री. गणेश कदम, एच-स्क्वेअर इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद राजेभोसले तसेच डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअरचे नवोपक्रम व उद्योजकता प्रमुख श्री. संदीप शिंदे उपस्थित होते.

या भागीदारीमुळे शाश्वत शेती पद्धती, अन्न विज्ञानातील प्रगती आणि कृषी उद्योजकतेसाठी नवीन संधी निर्माण होतील. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक व संशोधनाधारित उपाययोजना उपलब्ध होऊन त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे