करमाळा येथील फिरंगाई नगरमध्ये घरफोडी; अमोल जाधव यांच्या घरातील लाखोंचा ऐवज लंपास

करमाळा येथील फिरंगाई नगरमध्ये घरफोडी; अमोल जाधव यांच्या घरातील लाखोंचा ऐवज लंपास
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २६/ करमाळा शहरालगत असलेल्या फिरंगाई नगरमधील अमोल जाधव यांच्या नवीन वास्तूमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली असून, सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याची माहिती घरमालक अमोल जाधव यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल जाधव यांचे कुटुंब अद्याप या नवीन वास्तूत राहायला आलेले नाही, मात्र ते अधूनमधून तिथे जात असतात. त्यांचे जावई आराम करण्यासाठी तिथे गेले असता, त्यांना घराचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ जाधव यांना याची माहिती दिली. घरात पाहणी केली असता, एलईडी टीव्ही, पितळेची भांडी, कपडे आणि मुलांच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या वस्तूंचा बस्ता असा एकूण अंदाजे एक लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.
या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अमोल जाधव यांनी या प्रकरणी चिंता व्यक्त केली असून, पोलिसांनी तात्काळ तपास करून संबंधित चोरट्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.



